कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात वळवाचा धुवाधार पाऊस
घेवडा, बटाटा, सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान; शेतातील बांध, नालाबडिंगची फुटाफूट
शेतकर्यांची घेवडा काढणीची लगबग सुरू असताना, काल कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात आसनगाव, अनपटवाडी, राऊतवाडी, शहापूर व परिसरात तब्बल अडीच तास ढगफुटी सारखा वळवाचा पाऊस पडल्याने उत्तर भागातील पिकांचे आणि शेताचे मोठे नुकसान झाले आहे.
पिंपोडे बुद्रुक : शेतकर्यांची घेवडा काढणीची लगबग सुरू असताना, काल कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात आसनगाव, अनपटवाडी, राऊतवाडी, शहापूर व परिसरात तब्बल अडीच तास ढगफुटी सारखा वळवाचा पाऊस पडल्याने उत्तर भागातील पिकांचे आणि शेताचे मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी साडेपाचच्या सुमारास सुरू झालेला वळवाचा पाऊस रात्री आठ वाजेपर्यंत जोरात पडत होता. या पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्यांना दोन पैसे मिळवून देणार्या घेवडा नगदी पिकाच्या काढणीची व मळणीची लगबग सुरू आहे. शेतकर्यांची रास व घेवड्याचे ढीग व गावली शेतात तशीच पडून आहेत. अद्याप ऐंशी टक्के सराई बाकी आहे. मात्र, काल झालेल्या पावसाने शेतकर्यांची अक्षरशः धांदल उडाली. तब्बल अडीच तास धुवाधार झालेल्या पावसाने घेवडा, बटाटा, सोयाबीन व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतात पिके पाण्याखाली गेली.शेताचे बांध व नालाबडिंग फुटले आहेत. रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
आसनगाव, अनपटवाडी, राऊतवाडी, शहापूर गावांच्या परिसरात पिकांचे व शेताचे मोठे नुकसान झाले आहे. ओढे भरून वाहू लागले आहेत. गेल्या सतरा वर्षांत असा पाऊस कधीही झाला नव्हता, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. तर भागात वळवाच्या पावसाने घेवडा पीक धोक्यात आले आहे. पावसाने घेवडा कुजण्याची दाट शक्यता आहे. ओला घेवडा सुखवताना आणि व्यापार्याला विकताना शेतकर्यांच्या नाकीनऊ येणार आहे.