sports

सातारा एमआयडीसीसाठी पंधरा कोटी तर कोरेगावला एकसष्ट लाखाचा निधी

एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांची माहिती

‘महाराष्ट्र औद्योगिक विकास कॉर्पोरेशन अंतर्गत सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्राच्या बांधकाम तसेच त्यातंर्गत विविध कामांसाठी 14 कोटी 91 लाख 13 हजार 300 रुपये तर कोरेगाव (मिनी) औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यासाठी 60 लाख 97 हजार रुपयांची मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसीकडून प्रशासकीय मान्यता मिळाली  आहे,’ अशी माहिती ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.

दहिवडी : ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास कॉर्पोरेशन अंतर्गत सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्राच्या बांधकाम तसेच त्यातंर्गत विविध कामांसाठी 14 कोटी 91 लाख 13 हजार 300 रुपये तर कोरेगाव (मिनी) औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यासाठी 60 लाख 97 हजार रुपयांची मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसीकडून प्रशासकीय मान्यता मिळाली  आहे,’ अशी माहिती ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.

प्रशासकीय मंजुरीच्या पत्राची प्रत मन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे (मास) अध्यक्ष उदय देशमुख यांना देण्यात आली. 

यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे,  असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, क्षेत्र व्यवस्थापक सागर पवार, विक्रम मोहिते, सामाजिक कार्यकर्ते अनिल सुभेदार आदी उपस्थित होते. 

अविनाश सुभेदार म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात अग्निशमन केंद्राची नितांत गरज होती. तीच गरज ओळखून आमच्या विभागाचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अलबनगन यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्र व कोरेगाव औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांसाठी आम्ही प्रयत्नशील होतो. या प्रयत्नांना यश आले असून सातारच्या केंद्रासाठी 14 कोटी 91 लाख 13 हजार 300 रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या केंद्रांतर्गत अग्निशमन वाहने, इमारत बांधकाम, कर्मचार्‍यांसाठी  निवासस्थान आदी सोयीसुविधा राबवल्या जाणार आहेत. आपत्कालीन प्रसंगावेळी या अग्निशमन केंद्राचा फायदा सातारा परिसरासह जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात होणार आहे.’

कोरेगाव येथील मिनी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. त्यामुळे या ठिकाणच्या अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी 60 लाख 97 हजार रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे रस्त्याची दुरुस्ती होऊन चांगले रस्ते तयार होणार आहेत. ही कामे पावसाळ्यानंतर पूर्णत्वास येतील.


प्रशासकीय सेवेत विविध पदांवर असताना आपल्या जिल्ह्यात विविध विकासकामे आणण्यासाठी प्रयत्न केले. आता एमआयडीसीत कार्यरत असल्याने आपल्या जिल्ह्यातील एमआयडीसींसाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करता येतोय. आता सातारा व कोरेगाव एमआयडीसीसाठी निधी आणू शकलो. माण तालुक्यात 8 हजार हेक्टर क्षेत्रात एमआयडीसी उभी राहत आहे. यासाठीही सर्व यंत्रणा कार्यान्वित आहे. लवकरच त्याठिकाणीही एमआयडीसी उभी राहील. प्रशासकीय सेवेत असताना आपल्या भागासाठी कायतरी करता येतेय याचे मला खूप समाधान वाटतेय. यापुढेही आपल्या जिल्ह्यातील एमआयडीसीसाठी विविध प्रकारे निधी, उपक्रम राबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
- अविनाश सुभेदार, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, महाराष्ट्र राज्य.

सातारा एमआयडीसीमध्ये अग्निशमन केंद्र मंजूर होऊन त्यास निधी उपलब्ध करण्यात सुभेदार यांचा मोलाचा वाटा आहे. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा 40 वर्षे प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लागल्याने उद्योजकांमधून समाधान व्यक्त होत आहे. एमआयडीसीमध्ये घनकचरा निर्माण होत आहे. यासाठी अविनाश सुभेदार यांच्या माध्यमातून घनकचरा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यात येईल.  
- उदय देशमुख, अध्यक्ष, मन्युफॅक्चरिंग असोसिएशन.