sports

पुसेगाव परिसरात सततच्या पावसाने खरीप पिके धोक्यात

वाफसा नसल्याने पिके पिवळी : घेवडा व सोयाबीन उत्पादकांना फटका

पुसेगावसह परिसरात दररोज विजेच्या कडकडाटासह धो -धो पाऊस कोसळत असून, आठवडाभरात येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. सतत पडणार्‍या या मुसळधार पावसाने जमीन वाफशावर येत नसल्याने खरिपातील सोयाबीन, घेवडा ही पिके पिवळी पडत आहेत. त्यामुळे बळीराजाच्या हाताशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पुसेगाव : पुसेगावसह परिसरात दररोज विजेच्या कडकडाटासह धो -धो पाऊस कोसळत असून, आठवडाभरात येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. सतत पडणार्‍या या मुसळधार पावसाने जमीन वाफशावर येत नसल्याने खरिपातील सोयाबीन, घेवडा ही पिके पिवळी पडत आहेत. त्यामुळे बळीराजाच्या हाताशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, अल्पावधीत मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतामध्ये पाणी साठून राहत असून, वाफसा होत नसल्याने काढणीस आलेले सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. तर घेवडा पिकालाही याचा फटका बसला असून, अति पावसाने घेवड्याच्या शेंगा सडू लागल्या आहेत. परिणामी खरिपातील हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने येथील बळीराजा पूर्णपणे अडचणीत आला आहे.

खरीप हंगामातील सोयाबीन, घेवडा या पिकांवरच ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था अवलंबून असते. सततच्या मुसळधार पावसाने ही पिके उद्ध्वस्त होत असल्याने बळीराजा कोरोनाच्या संकटासोबतच आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक फटका
दरवर्षी सोयाबीन व घेवडा पिकांचे उत्पादन आम्ही घेतो. मात्र, यंदा सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे घेवडा व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घेवड्याच्या शेंगा सडल्याने पीक हातात येईल, याची देखील शाश्‍वती दिसत नाही. यामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
- मनोज मदने, शेतकरी, वर्धनगड.