कोरेगावमध्ये रेल्वे गुड्स शेडच्या उभारणीसाठी प्रयत्नशील
भरत मुळे यांची ग्वाही : कोरेगाव रेल्वे स्थानकावर बैठक संपन्न
‘रेल्वेच्या दृष्टीने कोरेगाव तालुक्याला पूर्वीपासून महत्व आहे. मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतरीत झाल्यानंतर रेल्वे गुड्स शेड बंद झाले. व्यावसायिक गरज आणि शेतकर्यांच्या शेतीमालासाठी कोरेगावात पुन्हा एकदा रेल्वेचे गुड्स शेड उभारणी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे,’ अशी ग्वाही पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य भरत मुळे यांनी दिली.
कुमठे : ‘रेल्वेच्या दृष्टीने कोरेगाव तालुक्याला पूर्वीपासून महत्व आहे. मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतरीत झाल्यानंतर रेल्वे गुड्स शेड बंद झाले. व्यावसायिक गरज आणि शेतकर्यांच्या शेतीमालासाठी कोरेगावात पुन्हा एकदा रेल्वेचे गुड्स शेड उभारणी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे,’ अशी ग्वाही पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य भरत मुळे यांनी दिली.
मुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्टेशन प्रबंधक भरतलाल मीना, प्रदीप फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरेगाव रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस ‘भाजप’चे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव कांबळे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, महिला आघाडी तालुकाध्यक्षा उज्ज्वला निकम, उपाध्यक्षा सुषमा निकम, कायदा आघाडीचे तालुकाध्यक्ष अॅड. अमोल भुतकर, श्रेयस काणे, भाऊ मतकर, राजेंद्र मतकर, जवानसिंग घोरपडे, महेश वडगावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुळे म्हणाले, ‘रेल्वेची वाहतूक गतिमान होण्यासाठी कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावर जलद पॅसेंजर सुरू करण्यात यावी. गोंदिया-कोल्हापूर दरम्यान धावणार्या महाराष्ट्र एक्स्प्रेसचे बुकिंग एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर सुद्धा पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत करता येण्यासाठी संगकणीकृत बुकिंग सेवा उपलब्ध ठेवावी,’ यासाठी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
फेरीवाल्यांची रेल्वेच्या मानकांप्रमाणे वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्रीस परवाना देण्यात यावा, अन्यथा फेरीवाल्यांवर सक्त कारवाई केली जावी. कचरा समस्या या फेरीवाल्यांमुळे तयार होत आहे. त्यांच्यावर व्यवसायाबद्दल तक्रार नाही, मात्र कचरा व्यवस्थापन करण्याची जबाबदारी निश्चित केल्यानंतरच त्यांना परवाना देण्यात यावा, अशी आग्रही मागणी मुळे यांनी केली.
रेल्वे ऑनलाइन बुकिंगची माहिती अद्याप ग्रामीण भागात पोहोचलेली नाही, त्याबाबत जागृती होणे आवश्यक असून, रेल्वे प्रशासनाने स्थानकावर तिकीट विक्री खिडकीच्या शेजारी दर्शनी भागात अथवा चौकशी कक्षालगत सविस्तर माहितीचा मराठी भाषेत फलक लावावा, जेणेकरुन रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ होऊन, उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. त्याचबरोबर ऑनलाइन बुकिंगची कार्यशाळा घेण्याची गरज मुळे यांनी व्यक्त केली.
यावेळी झालेल्या चर्चेत अॅड. अमोल भुतकर, बबनराव कांबळे, श्रेयस काणे यांनी भाग घेतला. समिती सदस्य व प्रवाशांनी केलेल्या मागण्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्यापर्यंत पोहोचविण्याची ग्वाही स्टेशन प्रबंधक भरतलाल मीना व प्रदीप फाळके यांनी दिली.