sports

पुसेगावमध्ये घरगुती गणपती बाप्पाचे जड अंत:करणाने विसर्जन


गेल्या दहा दिवसांपासून भक्तांकडून पाहूणचार घेत असलेल्या घरगुती गणपती बाप्पांचा, मंगळवारी (दि. 1) ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ असा निरोप देत जड अंत:करणाने पुसेगाव सुवर्णनगरीत विसर्जन झाले.  दरम्यान, सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या या सणाला विसर्जनासाठी यंदा पाणवठ्यांवर एकत्र येण्याऐवजी भागाभागांतच मूर्ती विसर्जन करण्यास नागरिकांनी पसंती दिली.

पुसेगाव : गेल्या दहा दिवसांपासून भक्तांकडून पाहूणचार घेत असलेल्या घरगुती गणपती बाप्पांचा, मंगळवारी (दि. 1) ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ असा निरोप देत जड अंत:करणाने पुसेगाव सुवर्णनगरीत विसर्जन झाले. 

दरम्यान, सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या या सणाला विसर्जनासाठी यंदा पाणवठ्यांवर एकत्र येण्याऐवजी भागाभागांतच मूर्ती विसर्जन करण्यास नागरिकांनी पसंती दिली.

ज्या गणरायाची भक्त वर्षभर आतुरतेने वर्षभर वाट पाहतात, त्या गणपतीचे आगमन कोरोनाच्या संकटात झालेले असताना देखील बाप्पाच्या स्वागतात आणि धार्मिक विधीत मात्र कोणतीही कमतरता ठेवू न देता पुसेगावकरांनी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. आपापल्या पातळीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून नागरिकांनी या सणाचा आनंद लुटला. बाप्पांचा दहा दिवस भक्तांच्या घरी छान पाहूणचार झाला. मात्र, मंगळवारी भाविकांनी जड अंत:करणाने आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.

दरवर्षी पुसेगाव येथील येरळा नदीघाट तसेच नेर तलाव या ठिकाणी पुसेगावसह परिसरातून हजारोंच्या संख्येने लोक येऊन आपापल्या गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. मात्र, यंदा कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने नागरिकांना आपापल्या भागातच गणेशमूर्तीचे विसर्जन करा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला गणेश भक्तांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसेच घरगुती गणपती विसर्जनाला होणारी गर्दी टाळण्यासाठी पुसेगाव पोलीस व प्रशासकीय यंत्रणा कार्यरत होती.