sports

संत संताजी जगनाडे महाराजांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी

यशेंद्र क्षीरसागर यांचे प्रतिपादन : कोरेगाव पंचायत समितीत जगनाडे महाराजांची जयंती साजरी

‘महान संत संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य अत्यंत मोलाचे होते.आजही ते प्रेरणादायी आहे,’ असे प्रतिपादन सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.

कोरेगाव : ‘महान संत संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य अत्यंत मोलाचे होते.आजही ते प्रेरणादायी आहे,’ असे प्रतिपादन सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.

येथील पंचायत समिती मुख्य कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी कक्ष अधिकारी, अधीक्षक तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस सर्वांनी पुष्पांजली वाहिली. 

क्षीरसागर म्हणाले, ‘संत जगनाडे महाराज 17व्या शतकात संत तुकारामांच्या समकालीन होऊन गेले. संत तुकाराम महाराज यांना त्यांनी मनापासून गुरू मानले.तुकाराम महाराजांच्या अभंगांचा, कीर्तनाचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला. समाजासाठी, समाजाच्या प्रबोधनासाठी जीवन वाहून घेण्याचे त्यांनी ठरविले.संत तुकारामांच्या 14 प्रमुख टाळकरी यापैकी जगनाडे महाराज स्वतः होते. घरची परिस्थिती अत्यंत उत्कृष्ट असूनही त्यांना कोणताही अहंकार नव्हता. ईश्‍वराच्या भक्तीत ते कायम लीन होते. संत तुकारामांनी 4 हजार अभंग लिहिले. ते अभंग संत संताजी जगनाडे महाराज यांना मुखोद्गत होते.’

जेव्हा इंद्रायणी नदी मध्ये तुकारामांचे अभंग बुडविले गेले. त्यानंतर जगनाडे महाराज यांनी सर्व अभंग स्वतः पुन्हा लिहून काढले. हे त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आणि लोकोत्तर आहे. त्यांनी हे कार्य केले नसते तर आज संत तुकाराम महाराजांचे अजरामर अभंग आपल्याला उपलब्ध झाले नसते. संसार आणि परमार्थ एकत्र कसा साधता येईल, याचे मार्गदर्शन तुकाराम महाराजांनी जगनाडे महाराज यांना केले आणि एक उत्कृष्ट शिष्य म्हणून जगनाडे महाराज यांनी तुकारामांचे सर्व आदेश तंतोतंत पालन करून त्यांची परंपरा पुढे चालवली.