sports

बील वसुलीसाठी गेलेल्या दोन वायमनला वीजग्राहकांची मारहाण

खिंगर येथील घटना : कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पाचगणी महावितरण कार्यालयाचे दोन कर्मचारी बील वसुलीसाठी गेले असता खिंगर (ता. महाबळेश्‍वर) येथे मारहाण झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, महावितरणच्या कर्मचार्‍यांनी आज याविरोधात काम बंद आंदोलन करून पोलीस ठाण्यात मारहाण करणार्‍यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

पाचगणी : पाचगणी महावितरण कार्यालयाचे दोन कर्मचारी बील वसुलीसाठी गेले असता खिंगर (ता. महाबळेश्‍वर) येथे मारहाण झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, महावितरणच्या कर्मचार्‍यांनी आज याविरोधात काम बंद आंदोलन करून पोलीस ठाण्यात मारहाण करणार्‍यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

याबाबत पाचगणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खिंगर (ता. महाबळेश्‍वर) येथे काल सायंकाळी 5:45च्या सुमारास थकीत बील वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी नितीन आंब्राळे व शिवाजी तुकाराम मालुसरे गेले असता या दोन वायरमनला सूरज दीपक झुंज, राकेश दीपक झुंज, बबीता दीपक झुंज यांनी मारहाण केल्याची घटना घडल्याचे संबंंधित वायरमन यांनी सांगितले. याप्रकरणी तिघांविरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरून पाचगणी पोलिसांकडून या तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलाश रसाळ व त्यांचे सहकारी करीत आहेत. 

दरम्यान, वायरमनला मारहाण करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, या साठीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक यशवंत महामुलकर यांना देण्यात आले असून, संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी पाचगणी महावितरणच्या वायरमननी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले आहे. 

यावेळी उपकार्यकारी अभियंता सचिन बाचल, सहायक अभियंता अशोक पाटील, पाचगणी शहर,  वसुली अधिकारी जितेंद्र खांडके, राजू खरात व पाचगणी उपविभागातील कर्मचारी उपस्थित होते.