sports

पुसेगावमध्ये जिल्हा परिषदेमार्फत अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप


कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात दक्षता घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेच्यावतीने पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘अर्सेनिक अल्बम-30’ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 

पुसेगाव : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात दक्षता घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेच्यावतीने पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘अर्सेनिक अल्बम-30’ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, खटाव पं. स. माजी उपसभापती संतोष साळुंखे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुजर, आरोग्य सेविका व सेवक उपस्थित होते. 
सद्य:स्थितीत कोरोना संसर्गाचा प्रभाव ग्रामीण भागातही वाढत असल्यामुळे उपाययोजना म्हणून सातारा जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या या उपक्रमात ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत गावातील आशा वर्कर यांच्यामार्फत घरोघरी गोळ्यांचे वाटप होणार असून, त्याच्या सेवणाची पद्धत, पाळायची पथ्य याची माहिती दिली जाणार आहे. 
उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, ‘कोरोना संकटाच्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही गरजूंना वेगवेगळ्या मार्गाने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती वाढविणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ही गोष्ट लक्षात घेऊनच जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या ‘अर्सेनिक अल्बम-30’ या भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या होमिओपॅथिक औषधाचे टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येणार आहे.’