सद्य:स्थितीतही शिवरायांची युद्धनीती उपयुक्त
अनंत जोशी यांचे मत : महिला कॉलेजमध्ये ‘शिवरायांची युद्धनीती’वरील व्याख्यान संपन्न
‘सद्य:स्थितीतही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली युद्धनीती उपयुक्त असून, आपल्या देशाच्या संरक्षण विभागाने शिवयुद्धनीतीतून धडे घेण्याची आवश्यकता आहे,’ असे मत इतिहास अभ्यासक अनंत जोशी यांनी व्यक्त केले.
सातारा : ‘सद्य:स्थितीतही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली युद्धनीती उपयुक्त असून, आपल्या देशाच्या संरक्षण विभागाने शिवयुद्धनीतीतून धडे घेण्याची आवश्यकता आहे,’ असे मत इतिहास अभ्यासक अनंत जोशी यांनी व्यक्त केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील इतिहास विभागाने आयोजित केलेल्या ‘शिवरायांची युद्धनीती’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सुनीता घार्गे होत्या. वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. तुळशीराम महानवर, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एम. भोसले, इतिहास विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला नलवडे, प्रा. प्रतिभा घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जोशी यांनी शिवयुद्धनीतीची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. शिवरायांचे युद्धतंत्र, चपळाई, राज्य विस्ताराचे धोरण, आरमार उभे करण्याचे ऐतिहासिक कार्य या सर्व गोष्टींचा ऊहापोह जोशी यांनी केला.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. सुनीता घार्गे यांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे, असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य महाराष्ट्रात घडले, शिवरायांचा आदर्श घेऊन सर्वच क्षेत्रांत अतिउच्च यश संपादित करता येऊ शकते, असे मत व्यक्त केले. इतिहासाशिवाय माणसाच्या अस्तित्वाला अर्थ नसतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी इतिहासाचे वाचन करणे आवश्यक आहे, असेही घार्गे म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला नलवडे यांनी केले. प्रा. दिलीप पवार व डॉ. अभिजीत पटेल यांनी कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केले. प्रा. मंदाकिनी वर्णेकर यांनी सूत्रसंचालन केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी भणगे हिने आभार मानले.