रणसिंगवाडी (ता. खटाव) येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने रक्तदान शिबिर आयोजन करून शिवजयंती उत्साहात साजरी केली. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख आप्पा घोरपडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.
निढळ : रणसिंगवाडी (ता. खटाव) येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने रक्तदान शिबिर आयोजन करून शिवजयंती उत्साहात साजरी केली. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख आप्पा घोरपडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.
यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आणि हर्ष फाउंडेशनच्या सहकार्याने या छोट्या गावात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 56 जणांनी रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला.
या शिबिराला युवक, युवती व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास एक लाख रुपयांचा मोफत विमा आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
घोरपडे म्हणाले, रक्तदान हे महादान आहे. एका मानवाचेच रक्त दुसर्या गरजू मानवाला चालते. आजच्या युगात रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे. भविष्यात रणसिंगवाडीत वैद्यकीय मदत कक्ष व सरकारी आरोग्य योजना ट्रस्ट मार्फत पुरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
तसेच डॉल्बी, मिरवणूक अशा कार्यक्रमांना फाटा देत रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमाचे संयोजन शिवजयंतीच्या निमित्ताने ग्रामस्थांनी एकत्र येत यशस्वीपणे पार पडल्याने परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.