sports

नाताळसह सलग सुट्ट्यांमुळे पाचगणी-महाबळेश्‍वर पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली


ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले पाचगणी-महाबळेश्‍वर सज्ज झाले असून, नाताळ सणानिमित्त सलग जोडून सुट्या आल्याने दोन्ही गिरिस्थाने पर्यटकांनी बहरली आहेत. विविध पॉइंट पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू असल्यामुळे अनेकांनी या गिरिस्थानावर सुट्टीचा आनंद एन्जॉय करण्यावर भर दिला आहे.

पाचगणी : ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले पाचगणी-महाबळेश्‍वर सज्ज झाले असून, नाताळ सणानिमित्त सलग जोडून सुट्या आल्याने दोन्ही गिरिस्थाने पर्यटकांनी बहरली आहेत. विविध पॉइंट पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू असल्यामुळे अनेकांनी या गिरिस्थानावर सुट्टीचा आनंद एन्जॉय करण्यावर भर दिला आहे.

पाचगणी येथील प्रसिद्ध टेबल लँड पठारावर घोडेसवारी व घोडागाडीतून रपेट मारण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. गुलाबी थंडी, आल्हाददायक वातावरणाचा पर्यटक कुटुंबीयांसह आनंद घेत आहेत. नौकाविहारासाठी वेण्णा लेकवर पर्यटकांची गर्दी होत आहे. घोडे सवारी, आंगाला झोंबणार्‍या थंडीत गरमागरम मक्याचे कणीस तर काही हौशी पर्यटक आइसस्क्रीमचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

 

निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या महाबळेश्‍वरमध्ये दरवर्षी विविध हंगामात लाखो पर्यटक भेटी देत असतात. परंतु, यावर्षी पर्यटन नगरी महाबळेश्‍वर-पाचगणी या दोन्ही शहरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात सुमारे सात महिने पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे येथील पर्यटन व्यावसायिक अडचणीत आले होते. राज्य सरकारने पर्यटन स्थळावरील बंदी उठवल्याने या दोन्ही गिरिस्थानावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे येथील स्थानिक पर्यटन व्यावसायिकात आनंदाचे वातावरण आहे. ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे दाखल होत आहेत. 

महाबळेश्‍वर-पाचगणी पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. येथे पर्यटनास येणार्‍या पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दोन्ही पालिकांकडून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिस कर्मचारी मागविण्यात आले आहेत. सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाच्या स्वागतासाठी व्यावसायिकही सज्ज आहेत. ठिकठिकाणी आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.