पाचगणी शहरातील घरगुती गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने स्वतःची अनोखी अशी यंत्रणा आज राबवल्याने पालिकेच्या कर्मचार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत पाचगणीसह ग्रामीण भागात कसल्याही वाद्यांचा निनाद न करता शांततेने आणि उत्साहात घरगुती गणेशाचे विसर्जन पार पडले. ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात आज गणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
पाचगणी : पाचगणी शहरातील घरगुती गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने स्वतःची अनोखी अशी यंत्रणा आज राबवल्याने पालिकेच्या कर्मचार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत पाचगणीसह ग्रामीण भागात कसल्याही वाद्यांचा निनाद न करता शांततेने आणि उत्साहात घरगुती गणेशाचे विसर्जन पार पडले. ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात आज गणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
दरम्यान, हे विसर्जन पारंपरिक पद्धतीने, सुरक्षित आणि गर्दी न करता पालिकेच्या कर्मचार्यांनी नियोजनबद्धरीत्या पार पाडले. पाचगणीमधील बर्याच गणपतींचे घरीच विसर्जन झाले. परंतु, ज्यांनी टेबललँडवरील तळवीत (तलाव) विसर्जन करण्यासाठी आणले त्या गणपतींची विधिवत पूजा, आरती झाल्यानंतर गणेशमूर्ती पालिकेच्या कर्मचार्यांकडे विसर्जनासाठी सुपूर्द केल्यानंतर हे कर्मचारी त्या तरफ्याच्या साह्याने तलावातील पाण्यात मधोमध नेऊन कर्मचारी विसर्जन करीत होते.
याकामी नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार व मुख्याधिकार्यांच्या आदेशानुसार पालिका कर्मचारी सूर्यकांत कासुर्डे, शशी मोहिते, धनंजय कर्हाडकर, बाबू झाडे, अफजल डांगे, सागर बागडे, नासिर शेख, आनंद चव्हाण, जगदीश बगाडे, तानाजी कासुर्डे हे दिवसभर या विसर्जनासाठी परिश्रम घेत होते.
पूजेचे साहित्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश
पाचगणी पालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेशमुर्ती विसर्जनाला प्राधान्य देण्यात आले होते. टेबल लँडवरील तळ्यांच्या शेजारी निर्माल्य कलश ठेवण्यात आला होता. यामध्ये नागरिकांनी पूजेचे साहित्य, निर्माल्य, हार, दुर्वा टाकून पालिकेच्या आवाहनाला 100 टक्के प्रतिसाद दिला.
ग्रामीण व शहरी भागात गणेशमूर्तींचे घरोघरीच विसर्जन
शासनाच्या नियमांचे पालन करून ग्रामीण बरोबरच शहरी भागातही बर्याच नागरिकांनी घरीच गणपती विसर्जन संकल्पना राबावल्याने त्यांचे कौतुक होत आहे. गोडवली, ता. महाबळेश्वर येथील ग्रामस्थांनी विधिवत आपल्या घराच्यासमोर गणपतीचे विसर्जन करून वेगळा पायंडा पाडला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, हा उपक्रम इतरांना उपकृत करणारा आहे.