sports

पुसेगावच्या एका शाळेतील सहा विद्यार्थी कोरोनाबाधित

शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय सोमवारी होणार्‍या बैठकीत घेण्यात येणार

एका कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संक्रमणामुळे पुसेगाव येथील एका विद्यालयातील सहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे शाळा बंद करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या येत्या सोमवारी होणार्‍या बैठकीत घेण्यात येणार आहे.

निढळ : एका कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संक्रमणामुळे पुसेगाव येथील एका विद्यालयातील सहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे शाळा बंद करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या येत्या सोमवारी होणार्‍या बैठकीत घेण्यात येणार आहे.

नेर (ता. खटाव) येथील एका मुलीचे आजोबा पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्या कुटुंबाची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात संबंधित कुटुंबातील एका शाळेची विद्यार्थिनी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. शाळा सुरू झाल्यापासून शासनाच्या निर्देशानुसार कोरोना प्रसार रोखण्यासाठी विद्यालयातर्फे सर्व प्रकारची दक्षता घेतली जात आहे, तरीही घरातील व्यक्तीद्वारे प्रसार झालेल्या विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेल्या त्या शाळेतील सहा विद्यार्थी बाधित असल्याचे आढळले आहे. यामध्ये नेरमधील दोन, तर पुसेगावमधील चार विद्यार्थी असल्याने शाळा त्वरित बंद करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांनी सांगितले.

नेर येथील मुलीचे आजोबा पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्या संपूर्ण कुटुंबाची तपासणी झाली. त्यात ही मुलगीही पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याचे समजताच दुसर्‍या दिवसापासून 13 फेब्रुवारीपासून शाळा बंद करण्यात आली. एका विद्यार्थिनीच्या माध्यमातून कोरोनाने प्रवेश केल्यामुळे लगेच शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी केली असता आणखी पाच विद्यार्थी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून त्यांची तब्येत ठणठणीत आहे. शाळेतील वर्गशिक्षक आणि स्वत: मुख्याध्यापक त्यांच्या संपर्कात आहेत.

दरम्यान, सर्व शिक्षकांचे कोरोना तपासणीचे आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आहेत. कुटुंबांच्या माध्यमातून कोरोनाने शाळेत प्रवेश केल्यानंतर शाळेने वेळीच दक्षता घेतल्यामुळे सहा विद्यार्थ्यांवर हा प्रसार थांबला आहे. शाळेतील एकही शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित नाही. पालकांनी स्वतःची व आपल्या मुलांची अधिक काळजी घ्यावी. विशेषतः विद्यार्थ्याला ताप, थंडी, सर्दी, खोकला यापैकी काहीही लक्षण आढळल्यास अशा विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत न पाठवता त्यांच्यावर त्वरित वैद्यकीय उपचार करावेत, असे आवाहन मुख्याध्यापिका चौगुले यांनी केले आहे. 

दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीच्या सोमवारी होणार्‍या बैठकीत शाळा केव्हा सुरू करावयाची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.