sports

पाचगणी बाजारपेठेत विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई

पालिका, महसूल व पोलिसांची संयुक्तिक मोहीम : दोन दिवसांत 9200 रुपयांचा दंड वसूल

पाचगणी बाजारपेठेवर नगरपालिका, पाचगणी पोलीस ठाणे आणि महसूल विभागाच्या संयुक्तिक पथकाची करडी नजर असून या पथकाने दोन दिवसांत पर्यटक, व्यापारी, ग्राहक व नागरिकांकडून मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या नियमांचे पालन न केल्याने दोन दिवसात तब्बल 9200 रुपयांचा दंड वसूल केला.

पाचगणी : पाचगणी बाजारपेठेवर नगरपालिका, पाचगणी पोलीस ठाणे आणि महसूल विभागाच्या संयुक्तिक पथकाची करडी नजर असून या पथकाने दोन दिवसांत पर्यटक, व्यापारी, ग्राहक व नागरिकांकडून मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या नियमांचे पालन न केल्याने दोन दिवसात तब्बल 9200 रुपयांचा दंड वसूल केला.

तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर आणि पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथक तयार करून ही मोहीम राबवण्यात येत आहे. 

या पथकात तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून भाऊसाहेब जगदाळे,  पाचगणीचे मंडलाधिकारी विजय ढगे, तलाठी शशिकांत वणवे, प्रशांत इंगवले, नीलेश गीते, सुनील खेडेकर, सूर्यकांत कासुर्डे, रवी कांबळे, शशिकांत मोहिते, नसीर शेख, सागर बगाडे, सहायक पोलीस फौजदार अरविंद माने, पोलीस नाईक शिवशंकर शेळके यांचा सहभाग आहे. 

पाचगणी शहरात पर्यटकांची संख्या अधिक असून शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या संसर्ग वाढू लागल्याने अनेक निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध कुणीही पाळताना दिसत नाही. त्यामुळे महसूल, पालिका व पोलीस विभागाने हे संयुक्तिक पथक तयार केले असून, ते गर्दीच्या वेळी बाजारपेठेत फिरून मास्क न घालणार्‍या लोकांकडून दंड आकारत आहेत तसेच काही व्यापारी वर्ग ही याचा अवलंब करताना दिसत नाही, त्यामुळे ही कारवाई होत आहे.

दंड आकारून कोरोना जाणार नाही, परंतु नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. मास्क वापरावेत तसेच गर्दी टाळावी सोशल डिस्टन्सचा वापर करावा तरच आपण कोरोना संसर्ग रोखून आपल्या शहराला व स्वतःला वाचविणार असल्याचे आवाहन पाचगणी पोलीस ठाण्याचे सपोनिसतीश पवार यांनी केले.