health

सकाळी -दुपारी की संध्याकाळी, फळं खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांचा सल्ला, वाट्टेल तेव्हा फळं खाल्ली तर..


In the morning-afternoon or evening, what is the best time to eat fruit? Expert advice, fruit when you want  If eaten ..
फळं तर नियमित खाता, पण तरीही ती अंगी लागत नसतील, तर फळ खाण्याची वेळ, त्यांचं प्रमाण किंवा कॉम्बिनेशन यापैकी नक्कीच काहीतरी चुकतंय..
दररोज जेवण जेवढं गरजेचं असतं, तेवढंच गरजेचं आहे फळं खाणं. पण फळ आणायला वेळ मिळत नाही, किंवा आणलेली फळं चिरून खाण्याचाही कंटाळा येतो किंवा मग दोन वेळा पोटभर जेवलं की फळं कधी खायची, हेच समजत नाही.. अशा अनेक जणांच्या अनेक तक्रारी असतात. त्यामुळे मग योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी फळं खाल्ली जात नाहीत आणि त्यामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळत नाही.
काही जण याच्या अगदी उलट असतात. फळं खायला प्रचंड आवडतं. पण म्हणून मग ते सकाळ- संध्याकाळ- रात्र अशी कोणतीही वेळ न बघता सरळ एखादं फळ उचलतात आणि तोंडात टाकतात. पण फळं न खाणं हे तब्येतीसाठी जसं चांगलं नाही, तसंच अयोग्य वेळी खाल्लेलं फळंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे फळं कशी आणि केव्हा खायची याचे काही नियम लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. 
या गोष्टी लक्षात घ्या...
रात्री जेवल्यानंतर आपण थेट सकाळी नाश्ता करतो. त्यामुळे यावेळी असा आहार हवा, जो पचायला हलका असतो. त्यामुळे बऱ्याचदा सकाळचा नाश्ता फायबरयुक्त पदार्थांचा असावा, असं आहारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे फळं सकाळी नाश्त्याच्या वेळी खाणं योग्य मानलं जातं कारण फळं पचायला हलकी असतात.
- फळांमध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि फायबर असतात. त्यामुळे फळं खाल्ल्यानंतर आपल्याला बराच वेळ भुकेची जाणीव होत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे जे लोक वेटलॉससाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनीही सकाळी नाश्त्याच्या वेळी फळं खाण्यास प्राधान्य द्यावे. 
- जेवण झाल्यानंतर लगेचच फळं खाऊ नये.
- ज्यांची कफ प्रकृती आहे, त्यांनी रात्रीच्यावेळी फळं खाणं टाळावं.
फळ खाण्याचे हे नियम लक्षात घ्या..
सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनीही काही दिवसांपुर्वी फळं खाताना पाळायचे ३ मुख्य नियम कोणते, याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता. 
१. त्यांच्या पहिल्या नियमानुसार एका वेळी एकच फळ खा. फळांचं मिक्सिंग करू नका. उदाहरणार्थ संत्री, मोसंबी, किवी ही लिंबूवर्गीय फळं खाणार असाल, तर त्यांच्या जाेडीला सफरचंद, केळी, चिकू अशी फळं घेऊ नका. प्रत्येक फळ पचनाचा कालावधी वेगवेगळा असल्याने फळाचं कॉम्बिनेशन टाळावं, असा त्यांनी सल्ला दिला आहे.
२. सकाळी नाश्ता झाल्यानंतर किंवा मग दुपारचं जेवणं आणि रात्रीचं जेवण यांच्या मधली वेळ ही फळं खाण्यासाठी योग्य वेळ मानली जाते.
३. फळांचा ज्यूस किंवा शेक करून तो पिण्यापेक्षा फळं चावून खाण्याला नेहमीच प्राधान्य द्यावे.