सातारा तालुक्यात चार ग्रामपंचायतीसाठी मतमोजणीची प्रक्रिया तहसील कार्यालयात पार पडली. निकाल हाती येताच विजयी उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
सातारा : सातारा तालुक्यात चार ग्रामपंचायतीसाठी मतमोजणीची प्रक्रिया तहसील कार्यालयात पार पडली. निकाल हाती येताच विजयी उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
सातारा तालुक्यात बहुतांशी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यामध्ये स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे तालुक्याच्या दोन्ही नेत्यांनी लक्ष घातले नव्हते. या निवडणुकीत धावडशी या ग्रामपंचायतीकडे सगळ्या तालुक्याच्या नजरा होत्या. तेथे मात्र, सत्तांतर झाले. सत्तांतर झाले असले तरीही सत्ता आमदार शिवेंद्रराजे यांच्या गटाकडेच राहिली आहे. तीच परिस्थिती कारी येथे आणि अंबवडे खुर्द या गावात झाली आहे. परंतु कोडोली येथे पोटनिवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाचा उमेदवार विजय झाला आहे.
सातारा तालुक्यात चार ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. त्यातील दोन ग्रामपंचायतीची सार्वत्रिक होती तर दोन ग्रामपंचातीसाठी पोटनिवडणूक होती. त्यामध्ये धावडशी या गावावर सगळ्या तालुक्याच्या नजरा होत्या. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे हे दोन्ही भाजपामध्ये असले तरीही गावागावात दोन्ही नेत्यांना मानणारे गट आहेत. असे असले तरीही या कारी, आंबवडे खुर्द आणि धावडशी या तिन्ही गावात आमदार शिवेंद्रराजे यांच्याच गटामध्ये दोन पॅनेल पडलेले होते. धावडशी या गावात शेतकरी विकास पॅनेल विरुद्ध श्री ब्रम्हेंद्रस्वामी परिवर्तन पॅनेल एकमेकांच्या विरोधात होते. दोन्हीही पॅनेल आमदार शिवेंद्रराजे गटाचेच होते. दोन्ही पॅनेलपैकी शेतकरी विकास पॅनेल ज्यांच्या नेतृत्वाखाली उभे होते त्या गटाची सत्ता गेली 25 वर्ष गावात होती, असे सांगितले जाते. जेव्हा निकाल हातात आला तेव्हा मात्र सरंपचपद हे ब्रम्हेंद्रस्वामी पॅनेलचे उमेदवार अरुण कारंडे हे विजयी झाले. त्यांच्याच गटाची सत्ता आल्याने गुलाल उधळत आमदार शिवेंद्रराजे यांचे आर्शिवाद घेण्यासाठी कार्यकर्ते व विजयी उमेदवार यांनी सुरुची बंगला गाठला. तसाच प्रकार कारी येथे घडला आहे. कारीमध्ये सुद्धा बिनविरोध करण्यामध्ये गावातल्या तरुणांचा पुढाकार होता. परंतु पुन्हा सरपंचपद हे थेट असल्याने निवडणूक लढवण्यासाठी एकाच पार्टीत दोन गट आमने-सामने आले. एक महिला वकील आणि दुसरी गावातील महिला अशी लढत झाली. महिला वकील केवळ 30 मतांनी पराभूत झाली. अंबवडे खुर्द येथेही आमदार शिवेंद्रराजे यांच्याच गटाच्या दोन उमेदवारांमध्ये लढत झाली. त्याचबरोबर कोडोली ग्रामपंचायतीसाठी एका वॉर्डाच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या विचाराचे उमेदवार शशिकांत चोरगे विरुद्ध अपक्ष उमेदवार दिलीप भोसले यांच्यामध्ये लढत झाली. आमदार महेश शिंदे यांच्या पॅनेलकडून उमेदवारच दिला नव्हता. त्यामुळे दिलीप भोसले या अपक्ष उमेदवाराला 63 मते, तर चोरगे यांना सुमारे 521 मते मिळाली असून आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाचे चोरगे हे विजयी ठरले आहेत.


