maharashtra

जिल्हा रुग्णालयात आढळला तोतया ब्रदर, फार्मासिस्ट

सुरक्षा रक्षकांमुळे बिंग फुटले, पोलिसात तक्रार

येथील जिल्हा रुग्णालयात तोतया ब्रदर, फार्मासिस्ट म्हणून वावरणाऱ्या संतोष साळुंखे याचे आज सुरक्षारक्षक पृथ्वीराज गायकवाड त्याच्यामुळे बिंग फुटले. जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तोतया विरोधात तक्रार देण्याची सूचना पृथ्वीराज गायकवाड याला केली.

सातारा : येथील जिल्हा रुग्णालयात तोतया ब्रदर, फार्मासिस्ट म्हणून वावरणाऱ्या संतोष साळुंखे याचे आज सुरक्षारक्षक पृथ्वीराज गायकवाड त्याच्यामुळे बिंग फुटले. जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तोतया विरोधात तक्रार देण्याची सूचना पृथ्वीराज गायकवाड याला केली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयासंदर्भात सातत्याने तक्रारींचा सूर उमटत आहे. अशातच एक जण गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात ब्रदर, फार्मासिस्ट म्हणून वावरत असल्याचे पृथ्वीराज गायकवाड यांच्या निदर्शनास आले. तोतया गिरी करणारा संतोष साळुंखे हा अंगात ऍपरण घालून विविध वार्डमध्ये फिरत असल्याचे निदर्शनास येत होते. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा एकदा वार्डमध्ये असल्यामुळे पृथ्वीराज गायकवाड याने तुम्ही जिल्हा रुग्णालयातील कोणत्या भागात काम करता अशी विचारणा त्याच्याकडे केली. त्यावर संतोष साळुंखे याने मी एनआरएचएममध्ये काम करतो, असे सांगितले. याबाबतची खात्री केली असता तो खोटे बोलत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी ही बाब जिल्हा रुग्णालयीन प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. प्रशासनाने तात्काळ संबंधितांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याच्या सूचना केल्यानंतर सुरक्षारक्षकांनी सातारा शहर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.

अपप्रवृत्तींना कोणाचा वरदहस्त?
जिल्हा रुग्णालय हा सध्या एक चर्चेचा विषय होऊ लागला आहे. अशा प्रकारच्या रुग्णालयात तोतयागिरी करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अपप्रवृत्तींना कोणाचा वरदहस्त आहे, हे पोलिसांनी शोधून काढणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयात अशा प्रकारची साखळी आहे का? याचाही शोध घ्यावा. रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि संतोष साळुंखे यांचा काही संबंध आहे का, हे तपासण्याची गरज आहे.