येथील नगरपालिकेत माहिती अधिकारामध्ये एकाने माहिती मागवली होती. ती संबंधित अधिकाऱ्याने अर्जदारास दिली. मात्र, माहिती अशीच का दिली? असे म्हणत एकाने पालिका अधिकाऱ्यांसोबत वाद घालत त्याला पालिकेच्या आवारात मारहाण केली. त्यामुळे संतप्त पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.
कराड : येथील नगरपालिकेत माहिती अधिकारामध्ये एकाने माहिती मागवली होती. ती संबंधित अधिकाऱ्याने अर्जदारास दिली. मात्र, माहिती अशीच का दिली? असे म्हणत एकाने पालिका अधिकाऱ्यांसोबत वाद घालत त्याला पालिकेच्या आवारात मारहाण केली. त्यामुळे संतप्त पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. गुरुवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एकाने नगरपालिकेमध्ये माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती मागवली होती. त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्याने संबंधिताला माहिती दिली. मात्र, माहिती अशीच का दिली? असे म्हणून संबंधिताने गुरुवारी सायंकाळी नगरपालिकेच्या आवारात येऊन माहिती दिलेल्या अधिकाऱ्याबरोबर वादावादी केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यासह संतप्त पालिकेच्या अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांनी याबाबतची तक्रार देण्यासाठी शहर पोलीस ठाणे गाठले.
त्यानंतर शहर पोलिस ठाण्यासमोर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी संतप्त कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, नगरपालिका कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


