maharashtra

कराडच्या स्टेट बँकेत ट्रेझरी शाखेच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

पेन्शन धारकांशी उद्धट वर्तन : पेन्शन धारक व शेतकरी संघटनेची कारवाईची मागणी

Arbitrary management of treasury branch officials in State Bank of Karad
येथील भारतीय स्टेट बँक, कराड ट्रेझरी शाखेत शेतकरी व पेन्शन धारकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील अधिकारी व कर्मचारी पेन्शन धारकांशी उद्धट वागत असून बँकेचे वाचमनही पेन्शन धारक व शेतकऱ्यांना ढकलून बाहेर काढतात. बँकेतील अधिकाऱ्यांची मनमानी सुरु आहे.

कराड : येथील भारतीय स्टेट बँक, कराड ट्रेझरी शाखेत शेतकरी व पेन्शन धारकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील अधिकारी व कर्मचारी पेन्शन धारकांशी उद्धट वागत असून बँकेचे वाचमनही पेन्शन धारक व शेतकऱ्यांना ढकलून बाहेर काढतात. बँकेतील अधिकाऱ्यांची मनमानी सुरु आहे. त्यामुळे अशा निर्ढावलेल्या बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून शेतकरी व पेन्शन धारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते अनिल घराळ यांनी केली.
सदर मागणीसंदर्भात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते अनिलबापू घराळ यांचे नेतृत्वाखाली शेतकरी व पेन्शन धारकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे व क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे सातारा जिल्हाध्यक्ष विजय पाटील, विभाग प्रमुख जयवंत पाटील, शिवाजी वाघमोडे, प्रसाद पाटील, शामराव जाधव, महादेव महाडिक, लालासो साळुंखे, दिलीप पाटील, मोहन दाखवले, शशिकांत ढेबे, फैय्याज नामदार, जिगर बागवान, पंडित राठोड, उत्तम नलवडे, उत्तम खबाले, शिवाजी लांडे, सुमन लांडे, रमेश नांगरे, मुरलीधर नलवडे आदी. पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, कराड स्टेट बँक ऑफ इंडिया ही ट्रेझरी शाखा आहे. या शाखेतील अधिकारी, कर्मचारी येथे येणारे पेन्शन धारक व शेतकऱ्यांना चांगली वागणूक देत नाही. त्यांच्याशी उद्धट वर्तन केले जाते. त्यांचे काम वेळेवर केले जात नाही. वेळप्रसंगी त्यांना बँकेतून हाकलून बाहेर काढले जात आहे. ग्राहकाच्या खूपच लांबच लांब रांगा लागलेल्या असताना अधिकारी फोनवर बोलण्यात मग्न असतात. शाखा प्रबंधक लक्ष देत नाहीत. तक्रारीची दखल घेतली जात नाही. शासन अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे खूप चांगले पगार देते, त्या पगाराच्या मानाने १० टक्केही काम हे कर्मचारी करत नाहीत. स्टेट बँकेत हुकूमशाही व मनमानी चालते. परंतु, पेन्शन धारक शेतकरी आपणास त्रास नको म्हणून तक्रार करत नाहीत.
तसेच महसूल विभागासह  विविध शासनाच्या विभागांची चलने भरण्याचे काम स्टेट बँकेत चालते. यासाठी एकच खिडकी ठेवण्यात आली आहे. बँक अधिकारी व कर्मचारी खूप घमेंडखोरपणे वागत आहेत. याचीही शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या आहेत मागण्या
भारतीय स्टेट बँकेच्या कामकाजाची वेळ वाढून मिळावी, कामचुकार कर्मचाऱ्यांना घरी पाठवावे, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचे ऑडिट करण्यात यावे, वरिष्ठ पातळीवर तपासणी व्हावी, ग्राहक, शेतकऱ्यांसह पेन्शन धारकांची होणारी गैरसोय थांबली जावी, बँकेची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात यावी, यासह विविध मागण्या सदर निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.