येथील भूविकास बँकेच्या चौकात शिवजयंती चे बॅनर लावताना विजेच्या धक्क्याने एक युवक जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. जखमी झालेल्या युवकाला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यामुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
सातारा : येथील भूविकास बँकेच्या चौकात शिवजयंती चे बॅनर लावताना विजेच्या धक्क्याने एक युवक जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. जखमी झालेल्या युवकाला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यामुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
सातारा शहरांमध्ये शिवजयंतीची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. येथील भूविकास बँकेच्या चौकांमध्ये खंडू वडापाव सेंटर लगत असणाऱ्या कमानीवर शिवजयंती चे पोस्टर लावण्यासाठी एक युवक वर चढला होता. त्यावेळी शेजारून जाणाऱ्या उच्च वीज वाहिनीचा अचानक त्याला स्पर्श झाल्याने जखमी होऊन तो खाली पडला. त्यामुळे परिसरात एकच धावपळ झाली.
नागरिकांनी त्या जखमी युवकाला तातडीने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या युवकाचे अद्याप नाव मात्र समजू शकलेले नाही. युवकाचा ज्याठिकाणी अपघात झाला ती जागा अतिशय धोकादायक आहे. या जागेवर होर्डिंग असून या होर्डिंगच्या वर थोड्याशा अंतरावरुन हाय व्होल्टेज वायर गेल्या आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या धोकादायक जागेमध्ये होर्डिंग लावणार्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी या जागेच्या मूळ मालकाला नोटीस बजावणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिली. सातारा शहर परिसरातील उच्च दाबाच्या वीज वाहिन्या या अंडरग्राउंड करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


