maharashtra

सज्जनगड परिसरात आढळलेल्या बिबट्याच्या बछड्याला मिळाली आईची कुस


वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात मादी बिबट्याचे फुटेज
सज्जनगड, ता. सातारापासून 10 किलोमीटरवर असणाऱ्या परिसरात दीड महिने वयाचा नरजातीचा बिबट्याचा बछडा आढळून आला होता. सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण आणि सह्याद्री प्रोटेक्शन ग्रुप यांच्या संयुक्त सहकार्याने या बिबट्याला त्याच्या आईचा सहवास मिळाला. मादी बिबट्या त्याच्या पिल्लाला घेऊन डोंगरालगतच्या घनदाट जंगलात निघून गेली.

सातारा : सज्जनगड, ता. सातारापासून 10 किलोमीटरवर असणाऱ्या परिसरात दीड महिने वयाचा नरजातीचा बिबट्याचा बछडा आढळून आला होता. सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण आणि सह्याद्री प्रोटेक्शन ग्रुप यांच्या संयुक्त सहकार्याने या बिबट्याला त्याच्या आईचा सहवास मिळाला. मादी बिबट्या त्याच्या पिल्लाला घेऊन डोंगरालगतच्या घनदाट जंगलात निघून गेली. ठोसेघर आणि कास परिसरातील नैसर्गिक अधिवास हा अनेक तृणबक्षी आणि नरबक्षी प्राण्यांनी समृद्ध आहे याचे वारंवार दर्शन सातारकरांना घडत असते. मंगळवारी दुपारी दीडच्या दरम्यान सज्जनगड परिसरातील रामघळ नावाच्या शिवारात दीड महिने वयाचा बिबट्याचा बछडा एका पायवाटे जवळील खडकावर निवांत पडल्याची माहिती सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांना समजली. त्यांनी घटनास्थळीत जाऊन त्या ठिकाणी तीन ट्रॅप कॅमेरे तैनात केले. वनविभागाचे कर्मचारी तसेच या मोहिमेकरता पुण्यावरून सह्याद्री प्रोटेक्शन ग्रुपला पाचरण करण्यात आले होते. वनविभागाने बिबट्याच्या बछड्याला रामघळ परिसरातील सुरक्षित ठिकाणी बिबट्याच्या बछड्याला एका खुराड्यांमध्ये ठेवले होते. सायंकाळी 4.30 ते रात्री 9.45 यादरम्यान प्रोटेक्शन ग्रुपचे सदस्य मादी बिबट्या आणि बछडा एकत्र यावे याकरता विशेष प्रयत्न करत होते. रात्री दहाच्या दरम्यान मादी बिबट्या अंदाज घेत घेत त्या परिसरातील खुराड्याजवळ आली. खुराड्यातून अलगद पिल्लाला उचलून ती जंगलाच्या दिशेने मार्गस्थ झाली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, वनरक्षक साधना राठोड, वनरक्षक मारुती माने. वनकर्मचारी संतोष दळवी यांचे तसेच या मोहिमेकरता पुण्यावरून सह्याद्री प्रोटेक्शन ग्रुपचे मोठे सहकार्य या मोहिमेला लाभले.