maharashtra

दीपावलीच्या दिव्याने उजळला जगदीश्वराचा गाभारा

किल्ले प्रकाशमान करण्याची सुहास राजेशिर्के यांची अभिनव संकल्पना

हिंदवी स्वराज्याची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील जगदीश्वराचा गाभारा गुरुवारी अनेक दिव्यांनी उजळला. दिवाळीला स्वराज्याचे साक्षीदार असणारे किल्ले दीपावली निमित्त दिव्यांनी उजळवून टाकण्याची अभिनव संकल्पना साताऱ्याची माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी मांडली आणि स्वतः रायगडावर जाऊन ती प्रत्यक्षात अमलात आणली.

सातारा : हिंदवी स्वराज्याची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील जगदीश्वराचा गाभारा गुरुवारी अनेक दिव्यांनी उजळला. दिवाळीला स्वराज्याचे साक्षीदार असणारे किल्ले दीपावली निमित्त दिव्यांनी उजळवून टाकण्याची अभिनव संकल्पना साताऱ्याची माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी मांडली आणि स्वतः रायगडावर जाऊन ती प्रत्यक्षात अमलात आणली. या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच गडावरील शिर्काई देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रमसुद्धा शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व येसूबाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक पद्धतीने पार पडला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांनी बलाढ्य शत्रूला नामोहरम करून जनतेचे स्वराज्य निर्माण केले. या स्वराज्याचा मेरुमणी किल्ले रायगड महाड तालुक्यात आहे. सर्वसामान्य लोक दिवाळी साजरी करतात. मात्र महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असणारे हे गड दिवाळीच्या मुहूर्तावर सुद्धा अंधारात राहतात. त्यामुळे हे किल्ले, किल्ल्यावरील ऐतिहासिक देवळे आणि इमारती दिव्याने प्रज्वलित करण्याची अभिनव संकल्पना साताऱ्याची माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी राबवली, आणि ती स्वतः कृतीद्वारे अमलात आणली . गुरुवारी सुहास राजेशिर्के यांनी जगदीश्वराच्या मंदिरात व येथील शिर्काई देवीच्या मंदिरामध्ये दिवे लावून या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ केला.
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची अस्मिता अशीच पुढच्या पिढीला प्रकाशमान पद्धतीने कळत राहावी आणि ऐतिहासिक गडकोटांचे व मंदिरांचे पावित्र्य दिवाळीच्या मुहूर्तावर दिव्याद्वारे जपले द्यावे ही या संकल्पनेमागची मूळ भूमिका असल्याचे सुहास राजेशिर्के यांनी सांगितले. शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व येसूबाई फाउंडेशन यांच्या वतीने येथील शिर्काई मंदिरामध्ये पारंपारिक पद्धतीने देवीचा ओटी भरण कार्यक्रम करण्यात आला. मंदिराची यावेळी सजावट करण्यात आली होती. तसेच समितीच्या महिला मंडळाच्या वतीने देवीची पारंपारिक पद्धतीने ओटी भरण्यात आली. साताऱ्याच्या वतीने सुहास राजेशिर्के यांनी शिर्काई देवीला वंदन करून तेथे दिवाळीनिमित्त दिवा प्रज्वलित केला. तसेच देवीला साडीचोळी अर्पण करण्यात आली.