साताऱ्यात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
सोहळा समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र चोरगे, उपाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी
सातारा जिल्हा हा नेहमीच सामाजिक आदर्श निर्माण करण्यात अग्रेसर असतो. २०१८ साला येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सातारा : सातारा जिल्हा हा नेहमीच सामाजिक आदर्श निर्माण करण्यात अग्रेसर असतो. २०१८ साला येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या दुष्टचक्रानंतर आता पुन्हा एकदा सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली असून यावर्षी ७ मे २०२३ रोजी साता-यात पुन्हा एकदा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून त्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांची, तर उपाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी, मार्गदर्शक सदस्यपदी हरिष पाटणे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीला नुकतेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती चंदा ढबाले यांच्या हस्ते परवानगीचे पत्र प्रदान करण्यात आले. २०१८ प्रमाणे याही सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये इच्छुकांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस विवाह सोहळ्यासाठी वाढत जाणारा खर्च तसेच वधु-वर पालकांवर येणार ताण यासाठी राज्यभरात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याची संकल्पना राबवण्यात आली. याचे राज्य मार्गदर्शक धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन हे आहेत. सामाजिक सुधारणा आणि उपक्रमांमध्ये कायम अग्रेसर असलेल्या सातारा जिह्याने ही संकल्पनाही उत्तमरित्या राबवली. साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांच्या नेतृत्वाखाली २०१८ साली मोफत सामुदायिक विवाह सोहळा घेण्यात आला. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. कोरोनाच्या कालावधीत थांबलेला हा उपक्रम पुन्हा एकदा सुरु करण्यात आला असून सातारा जिल्हयात यावर्षी ७ मे २०२३ रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याचे नोंदणीकृत समितीमार्फत आयोजन केले आहे. त्यासाठी जिल्हा स्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून त्याच्या अध्यक्षपदी राजेंद्र चोरगे, उपाध्यक्ष विनोद कुलकर्णी, सचिव शैलेंद्र ऊर्फ रविंद्र भारती (झुटींग), खजिनदार सीमा जाधव (कुटे), सदस्य - हरिष पाटणे, बाळकृष्ण कासार, सदाशिव बागल, निळंकठ शिवाचार्य धारेश्वरस्वामी, विजय पोरे, गिरीष पवार, रामचंद्र रसाळ, ॲड. प्रशांत साळुंखे, ॲड. रितेश सुतार, ॲड. प्रियांका नामदास, ॲड. अर्चना मोरे यांचा समावेश आहे. या समितीला समितीला परवानगीचे पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळी समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. याहीवर्षी या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहनही समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांचा पुढाकार
साताऱ्यात २०१८ साली झालेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी २९ जणांचा विवाह झाला होता. सर्वांचा सुखाने संसार सुरु असून मोफत विवाह सोहळ्यामुळे आई-वडिलांना कर्ज झाले नाही. साताऱ्यातील हा सोहळा सर्वात आदर्श ठरला होता. राजकीय, उद्योजक, सामाजिक, सर्वसामान्यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाखाली झाला होता. यावर्षी पुन्हा एकदा सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती चंदा ढबाले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समितीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्या नेतृत्वाखाली याहीवर्षी राज्यात आदर्शवत असा सोहळा करण्याचा संकल्प समितीने केला आहे.


