पर्यावरणाच्या संतुलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर काळाची गरज
आ. पृथ्वीराज चव्हाण : मलकापुरात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त सौर ऊर्जा व ई-वाहनाचे प्रदर्शन संपन्न
स्वच्छ पर्यावरणासाठी पुढील काही वर्षांमध्ये जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहने वापरणे काळाची गरज आहे. भविष्यात नागरिकांनी जास्तीत-जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड : स्वच्छ पर्यावरणासाठी पुढील काही वर्षांमध्ये जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहने वापरणे काळाची गरज आहे. भविष्यात नागरिकांनी जास्तीत-जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त सौर ऊर्जा व ई-वाहन प्रदर्शनाचे आयोजन मलकापूर नगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी १७ रोजी करण्यात आले होते. या सप्ताहाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी, ते बोलत होते. यावेळी मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व नागरिक उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ऑटो इंडस्ट्रीमध्ये आज झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीच्या काही कंपन्यांनी भारतात आपले जाळे मजबूत केले आहे. या मोटारसायकलींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढले आहे. कार उत्पादनाची गरज लक्षात घेता भविष्यात त्याचीही उत्पादन वाढ होईल.
दरम्यान, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली. तसेच त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादन खर्च, कालावधी, वाहनांचा दर्जा, बॅटरी क्षमता, चार्जिंग कालावधी याची माहिती घेतली. त्याचबरोबर वाहनांच्या विक्री पश्चात सर्व्हिसचा सुद्धा विचार महत्वाचा असल्याचेही त्यांनी इलेक्ट्रिक वाहन डिस्ट्रिब्युटर यांना सांगितले.


