maharashtra

विद्यार्थी घडल्यास भारत घडेल : साहित्यिक अरुण जावळे


भारतीय संविधान हे या देशातील १३५ कोटी लोकसमुहाच्या जगण्याचा मुलाधार आहे. या संविधानाबद्दल प्रथमतः विद्यार्थ्यांना साक्षर करायला हवे. आपले हक्क - अधिकार कोणते ? कर्तव्ये काय आहेत हे शाळा - महाविद्यालयातून त्यांना सांगणे गरजेचे आहे.

सातारा : भारतीय संविधान हे या देशातील १३५ कोटी लोकसमुहाच्या जगण्याचा मुलाधार आहे. या संविधानाबद्दल प्रथमतः विद्यार्थ्यांना साक्षर करायला हवे. आपले हक्क - अधिकार कोणते ? कर्तव्ये काय आहेत हे शाळा - महाविद्यालयातून त्यांना सांगणे गरजेचे आहे. आपण १९४९ रोजी स्वतः प्रत अर्पण केलेले आणि प्रत्यक्षात आज व्यवहारात असलेले संविधान यातील बारकावे विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे कळल्याशिवाय त्यांना वस्तुस्थितीचा अंदाज येणार नाही. विद्यार्थीसमूह हा एका अर्थाने महाऊर्जेचा महास्त्रोत असतो. विद्यार्थी पिढी म्हणजे एक नवं राष्ट्र असते आणि त्या राष्ट्राची एक स्वतंत्र परिभाषा असते. म्हणून आधी विद्यार्थी घडवावा लागेल. तो घडला की राष्ट्र आपोआप घडेल, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देण्याचे कार्य करत असलेली दिशा अकॕडमी, पत्रकार संस्था वाई व मानववाधिकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संविधानाचा ७३ वा वर्धापन दिन वाई येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून साहित्यिक अरुण जावळे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, बाळासाहेब सणस, सुशीलकुमार कांबळे, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, माहिती अधिकार कार्यकर्ते शिवाजी राऊत, अशोक येवले, दिशा अकॅडमीच्या प्रा. चव्हाण मॕडम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

अरुण जावळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, भारतीय संविधानामुळे या देशातील सर्वसामान्य माणसाला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले. अगदी लिहिण्या - वाचण्या - बोलण्यापासून ते कुठेही संचार करण्याचे आणि स्थायिक होण्यापर्यंतचे ! खरेतर हे सर्व शक्य झाले ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत गेल्यामुळे. ते जर शाळेत गेले नसते तर कदाचित सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारे या देशाचे संविधान निर्माण झाले नसते. हिंदू कोड बिलामुळे महिलांना वारसाहक्क तर मिळालाच परंतु संपत्तीमध्ये समान हक्क सुध्दा प्राप्त झाला. पाश्चात्त्य देशात स्त्रियांना मताधिकार आंदोलन करून १९६० साली मिळाला. मात्र भारतात आंदोलन न करताच फक्त संविधानामुळे प्राप्त झाला. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारदृष्टी आणि संविधान निर्माणापाठीमागची भूमिका किती व्यापक आणि विशाल होती हे लक्षात येते.

शिवाजी राऊत यांनी आपल्या मनोगतात संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे यावर भाष्य केले. अनिल सावंत यांनी संविधाना संदर्भात प्रबोधनात्मक कार्यक्रम वाई येथे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. दिशा अकॕडमीच्या संचालक प्रा. चव्हाण मॕडम यांनी प्रास्तविक करून कार्यक्रमाबाबतची भूमिका स्पष्ट केली. अशोक येवले यांनी सूत्रसंचालन करून आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच विद्यार्थी - विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.