कुडाळ, ता. जावळी गावात वर्षानुवर्ष स्मशानभूमीच नसल्याने या गावकऱ्यांनी चक्क पावसात अंत्ययात्रेनंतर मृतदेह दफन केला असल्याची खळबळ जनक घटना नुकतीच समोर आली आहे.
सातारा : कुडाळ, ता. जावळी गावात वर्षानुवर्ष स्मशानभूमीच नसल्याने या गावकऱ्यांनी चक्क पावसात अंत्ययात्रेनंतर मृतदेह दफन केला असल्याची खळबळ जनक घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी, महाबळेश्वर तालुक्याच्या सरहद्दीवर कोयना विभागातील सालोशी हे गाव येते. महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव झाला, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला, मात्र कोयना धरणासाठी त्याग केलेल्या सालोशीवासियांना स्मशानभूमी सुद्धा मिळालेली नाही. या गावकऱ्यांनी प्रशासकीय मदतीची वाट न पाहता गावातून लोकवर्गणीतून स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय घेतला. दि. २१ रोजी गावातील एका गावकऱ्यांचे निधन झाले. त्यांचे अंतिम संस्कार रितीरिवाजानुसार अग्नी न देता भर पावसात अक्षरशः मृतदेह दफन केला.
या विभागामध्ये लोक प्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. आमच्या भागाचे दुर्भाग्य आहे, शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आम्हाला अजूनही पारतंत्र्याची वागणूक मिळत आहे. आजही आमच्या गावाला आणि कांदाटी खोऱ्यातील अनेक धरणग्रस्त गावांना स्मशानभूमी, आरोग्यकेंद्र, रस्ते अशा सुविधा मिळालेल्या नाहीत, असे गावकऱ्यांनी सांगितले.


