बोरखळ, तालुका सातारा येथे बैलगाडी शर्यती दरम्यान एका बैलगाडीतून पडलेल्या 21 वर्षे युवकाच्या अंगावरून मागून येणाऱ्या बैलगाडीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली.
सातारा : बोरखळ, तालुका सातारा येथे बैलगाडी शर्यती दरम्यान एका बैलगाडीतून पडलेल्या 21 वर्षे युवकाच्या अंगावरून मागून येणाऱ्या बैलगाडीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली. गणेश वाडी येथील पुष्कर पवार असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. या प्रकरणाची गंभीर दखल सातारा तालुका पोलीस ठाण्याने घेतली असून याप्रकरणी शर्यतीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बोरखळ, तालुका सातारा येथे गावांमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चारच्या दरम्यान शर्यतीमध्ये बैलगाडी भरधाव धावताना पुष्कर पवार हा युवक तोल जाऊन खाली पडला. त्यावेळी मागून येणाऱ्या बैलगाडीचे चाक अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेबाबत एकच हळहळ व्यक्त होत आहे. सातारा तालुका पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. पुष्कर याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असता त्याला तेथे मृत घोषित करण्यात आले. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी संबंधित बैलगाडा स्पर्धा संयोजकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


