deshvidesh

पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपची उमेदवारी संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर


कडेगाव : पुणे पदवीधर मतदार संघाची भाजपाची उमेदवारी कडेगाव येथील संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर झाली आहे. भाजपाकडून शेखर चरेगावकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे, सचिन पटवर्धन, प्रसन्नजीत फडणवीस, शौमिका महाडिक, माणिक पाटील-चुयेकर आदी नावांची चर्चा होती. यात संग्रामसिंह देशमुख यांनी बाजी मारली. भाजपचे राष्ट्रीय प्रभारी सचिव अरुण सिंह यांनी ही घोषणा केली आहे . पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक एक डिसेंबर रोजी होत आहे. कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सार्‍यांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्या भाजपने नाव जाहीर करून प्रचार यंत्रणेला वेग देण्यात आघाडी घेतली आहे. संग्रामसिंह देशमुख यांना मोठा रोजकीय वारसा आहे. सांगली, सातारा आणि पुणे या तीन जिल्ह्यांशी देशमुख यांचा थेट कनेक्ट आहे. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपमध्ये आले. संग्रामसिंह यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढली, जिंकली आणि तीन वर्षे ते अध्यही राहिले. जिल्हा मध्यवर्ती बँकेत ते सलग पाच वर्षे उपाध्यक्षपदावर आहेत. गोपूज येथे त्यांनी स्वतःचा खासगी साखर कारखाना उभा केला आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीकडून कुणाचे आव्हान उभे राहील याकडे आता सार्‍यांच्या नजरा लागल्या आहेत.