कराड येथील बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात तसेच प्रवाशांच्यात खळबळ उडाली.
कराड : कराड येथील बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात तसेच प्रवाशांच्यात खळबळ उडाली. घटनास्थळी कराड शहर पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड बसस्थानकात गेल्या 15 दिवसापासून एकाच जागेवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 असावे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला.
कराड बसस्थानक परिसरात आढळून आलेल्या मृतदेहाबाबत घातपात झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कदाचित गारठ्यामुळे मृत्यू झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. तरीही शवविच्छेदन आवाहल आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.


