रिक्षाचा भीषण अपघात; एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू
यात्रेसाठी निघालेल्या आई-वडिलांसह मुलीवर काळाचा घाला
कराड तालुक्यातील उंडाळे भागातील येणपे-लोहारवाडी येथे रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी समोर आली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून, तिघांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमधे पलुंद्रे ता. शाहूवाडी येथील एकाच कुटूंबातील तिघेजण आहेत.
कराड : कराड तालुक्यातील उंडाळे भागातील येणपे-लोहारवाडी येथे रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी समोर आली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून, तिघांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमधे पलुंद्रे ता. शाहूवाडी येथील एकाच कुटूंबातील तिघेजण आहेत.
पुण्यावरून यात्रेसाठी गावी निघाल्यावर आई, वडिल आणि मुलगी यांच्यावर काळाने घाला घातला, तर मुलगा गंभीर जखमी आहे. या भीषण अपघातात सुरेश सखाराम महारूगडे, सुवर्णा महारूगडे यांच्यासह मुलीचा मृत्यू झाला. या घटनेने पणुंद्रे गावासह शाहूवाडी तालुक्यावर शोककळा पसरली. दरम्यान महारूगडे यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली. पणुंद्रे गावची यात्रा असल्याने पुण्यात कामानिमित्त रहात असलेले महारूगडे कुटूंबिय गावी येत होते. पुण्यातून रिक्षाने ते पणुंद्रे गावाकडे पोहचण्यापुर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. शनिवारी पहाटेच्या सुमारास लोहारवाडी-येणपे गावाजवळ ते प्रवास करत असलेल्या रिक्षाला भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी जाऊन जखमींची विचारपूस करत नेमका अपघात कसा झाला, याची चौकशी सुरू केली होती. या भीषण अपघाताची चर्चा पसरल्याने घटनास्थळावर गर्दी झाली होती.


