सातारा : श्री. छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही केवळ ऐतिहासिक घटना नव्हती तर भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा दिवस होता. त्यांच्या राज्याभिषेकांमुळे इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले. महाराष्ट्र म्हणजे स्वाभिमान, देशाभिमान, वैयक्तिक स्वार्थीपेक्षा राष्ट्राच्या हिताला नेहमी प्राधान्य देत आला त्यामुळेच मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले हे रुढ झाले. हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांपासून नाही तर रामायण, महाभारतापासून आहे. या इतिहासाची आठवण सध्याच्या राज्यकर्त्यांनी आणि जनतेने ठेवणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही वर्षात ते होताना दिसत नाही हा चिंतेचा विषय आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
येथील नगरवाचलनालयाच्या पाठक हॉलमध्ये मसाप, शाहुपुरी शाखेने नरहर कुरुंदकर यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित केलेल्या महाराष्ट्र आणि भारत एक अनुबंध या विषयावर डॉ. मोरे बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत विश्वास दांडेकर, किशोर बेडकिहाळ उपस्थित होते.
डॉ. मोरे यांनी महाराष्ट्र आणि भारतामधील अनुबंध अनंत काळापासून कसा आहे याबाबत माहिती सांगितली. रामायण, महाराभारतापासून ते अगदी श्री.छ. शिवाजी महाराज ते स्वातंत्र्यपूर्व लढा, स्वातंत्र्योत्तर काळ ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंतच्या काळाचा आढावा घेत महाराष्ट्राने नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे. स्वाभिमान जागवला आहे. अन्यायाविरुध्द आवाज उठवला आहे. गुलामगिरी उखडून टाकण्यासाठी उठाव केला आहे. आधुनिक, वैज्ञानिक, प्रगती होण्यासाठी प्रयत्न केले असून त्याला साथ देऊन त्यात पुढाकार घेतला आहे. श्री.छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा असा दिवस म्हणता येईल. ते शककर्ते झाले. त्यानंतरचा इतिहास बघितला तर ज्या मुघलांनी स्वराज्य संपवण्यासाठी प्रयत्न केले मराठ्यांनी ते त्यांचे प्रयत्न उधळून तर लावलेच परंतु त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण हिंदुस्थान आपल्या अंमलाखाली ठेवला. इतर धर्मियांवर आक्रमण न करणे परंतु स्वधर्म जपणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. स्वांत्र्यलढ्याचा इतिहास बघितला तर लोकमान्य टिळक हे भारतीय पातळीवरचे पहिले नेते होते.
१९४२ च्या चले जाव चळवळीपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिकांनी गांधीजींची साथ सोडली नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, धनंजयराव गाडगीळ, काकासाहेब गाडगीळ यांचे मोलाचे योगदान होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत स्व.यशवंतराव चव्हाण यांचे योगदान होते त्यानंतर पंडित नेहरुंनी त्यांना केंद्रात संरक्षणमंत्रीपद दिले. त्यांच्या कार्यकाळातच भारतीय सैन्याची पुर्नरचना, मनोधैर्य उंचावण्याचे काम त्यांनी केले त्यामुळेच हिमालयाच्या रक्षणासाठी सहयाद्री धावला हा प्रचार रुढ झाला आणि तो खराही आहे. हा सर्व इतिहास सध्याच्या राज्यकर्त्यांनी आठवणे गरजेचे असून जनतेनेही त्यांना जाणीव करुन द्यायला पाहिजे. मात्र गेल्या काही काळातील घटना पाहता महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याची खंतही डॉ.मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रारंभी पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक किशोर बेडकिहाळ यांनी केले. मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी तर आभार ॲड. चंद्रकांत बेबले यांनी मानले. यावेळी डॉ.राजेंद्र माने, डॉ. उमेश करंबेळकर, श्रीधर साळुंखे, सचिन प्रभुणे, ॲड. बाळासाहेब बाबर, मसाप, शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य, साताऱ्यातील साहित्यप्रेमी उपस्थित होते.


