टिपर चोरीस गेल्याचा बनाव करून इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळवण्याचा कट करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
सातारा : टिपर चोरीस गेल्याचा बनाव करून इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळवण्याचा कट करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
यश अरुण इनामदार रा. सोमवार पेठ, कराड, विजय कदम, संतोष साळुंखे दोघेही रा. नागठाणे, ता. सातारा, नेताजी निंबाळकर रा. मांडकी, ता. माळशिरस अशी जेरबंद केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम व टिपर हस्तगत करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२२ जुलै २०२२ रोजी रात्री १०.३० ते दि.२३ जुलै रोजी ८.३० वाजण्याच्या दरम्यान नागठाणे येथून टिपर क्रमांक एम.एच.११ एएल ५७८० चोरीला गेल्याची तक्रार विजय रामचंद्र कदम राहणार नागठाणे, ता. सातारा यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली होती. हा गुन्हा उघडकीस अन्नाच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किशोर कुमार यांना दिल्या होत्या. त्यानुसार किशोर धुमाळ यांनी एक विशेष पथक तयार केले. तपास करीत असताना यश अरुण इनामदार, राहणार सोमवार पेठ, कराड याने हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले, विजय कदम यांचा टिपर क्रमांक एम.एच.११ एएल ५७८० चे कर्जाचे हप्ते थकले होते. कदम यांना पैशाची गरज असल्याने त्याकरता तिपर चोरीला गेला असल्याचे दाखवून त्याचा इन्शुरन्स मंजूर करून घेऊन पैसे मिळवायचे. त्यानंतर तो टिपर कदम यांच्या ओळखीचे नेताजी निंबाळकर यांच्या ताब्यात द्यायचा असे ठरले. त्या टिपरचा क्रमांक एम.एच.१२ एचडी ५२१६ असा बदलून तो वापरायचा. गिऱ्हाईक मिळाल्यानंतर पेपरची विक्री करायची व मिळालेले पैसे वाटून घ्यायचे असा कट डंपर मालक विजय कदम त्यांचे मित्र संतोष साळुंखे, नेताजी निंबाळकर यांनी केला होता. ठरलेल्या कटाप्रमाणे विजय कदम तसेच संतोष साळुंखे यांच्या सांगण्यावरून डंपर चोरी केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर विजय कदम व संतोष साळुंखे यांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे मान्य केले. इन्शुरन्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी चोरीचा बनाव करून लपवून ठेवलेले ३ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम व टिपर हस्तगत करण्यात आला.
या कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तमराव दबडे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, संतोष पवार, अतिश घाडगे, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव यांनी सहभाग घेतला.


