शहराजवळ वाढे फाटा येथे महामार्गावर गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. तर त्याच्यापाठीमागे बसलेल्या एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.
सातारा : शहराजवळ वाढे फाटा येथे महामार्गावर गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. तर त्याच्यापाठीमागे बसलेल्या एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.
तेजस राजेंद्र गायकवाड (वय २२, रा. मोरघर, ता. जावळी) असे अपघातात जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर संतोष विश्वनाथ गायकवाड (वय ३९, रा. मोरघर, ता. जावळी) असे जखमीचे नाव आहे. संतोष यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेजस आणि संतोष हे चुलते पुतणे साताऱ्यातील आैद्योगिक वसाहतीमध्ये काम करतात. नेहमीप्रमाणे ते मोरघरहून दुचाकीवरून सकाळी कामावर निघाले होते. महामार्गावर वाढे फाटा येथे आल्यानंतर एका शोरुमजवळ अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून भीषण धडक दिली. त्यानंतर तेजस गायकवाड याच्या डोक्यावरून वाहनाचं चाक गेलं. यात त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. अंगावर शहारे आणणारे हे दृश्य पाहून ये-जा करणारे वाहन चालकही स्तब्ध झाले. या अपघातानंतर सातारा तालुका पोलिसांनी घटनास`थळी धाव घेऊन जखमी संतोष गायकवाड यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तेजस हा एकुलता एक होता. शिक्षण घेत तो कुटुंबाला काम करून हातभार लावत होता. त्याच्या मृत्यूने गायकवाड कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


