maharashtra

लग्नातील अक्षतांवरून वऱ्हाडींमध्ये धुमश्‍‍चक्री...!!


Dhumashchchakri in brides on the occasion of marriage
केवळ अक्षता टाकण्याच्या कारणावरून काल एका लग्नसोहळ्यात धुमश्चक्री उडाली. त्यातून वऱ्हाडी मंडळींना पोलिस ठाण्याची पायरी गाठावी लागली. पाटेश्वरनगर (ता. सातारा) येथे असलेल्या एका मंगल कार्यालयात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.

नागठाणे : केवळ अक्षता टाकण्याच्या कारणावरून काल एका लग्नसोहळ्यात धुमश्चक्री उडाली. त्यातून वऱ्हाडी मंडळींना पोलिस ठाण्याची पायरी गाठावी लागली. पाटेश्वरनगर (ता. सातारा) येथे असलेल्या एका मंगल कार्यालयात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.
बेबी रमेश चव्हाण (वय ४५, रा. बोरगाव, ता. सातारा, हल्ली रा. सेक्टर २०, गावदेवी मैदान, नेरुळ, मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की शुक्रवारी दुपारी पाटेश्वरनगर येथील मंगल कार्यालयात त्यांचा मोठा मुलगा विक्रम याचे लग्न होते. लग्नाच्या मंगल अक्षता सुरू असताना शेवटच्या अक्षतावेळी मुलीकडील नातेवाईक मच्छिंद्र सुखदेव शिंदे व जालिंदर सुखदेव शिंदे यांनी भाचा विनायक संतोष बाबर याला ‘तुमच्या नातेवाइकांनी टाकलेल्या अक्षता आम्हाला लागल्या आहेत,’ असे म्हणून त्याला अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली.
याचा जाब विचारण्यासाठी भावजय सत्त्वशीला संतोष बाबर या गेल्या असता त्यांना मच्छिंद्र व जालिंदर शिंदे, शोभा नारायण शिंदे, साखराबाई सदाशिव जगताप, वैजंता फकिरा शिंदे, सीमा गुलाब शिंदे, निखिल नारायण शिंदे व निकिता गणेश लगस (सर्व रा. भाईदास भुता चाळ, अंधेरी पूर्व, मुंबई) यांनी मला शिवीगाळ करत सत्त्वशीला बाबर व भाचा विनायक बाबर यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या बहिणीच्या दोन मुली सुनीता आकाश शिंदे व शिवानी अमोल यादव यांनाही मारहाण केली. या मारहाणीत गरोदर असलेल्या एका महिलेस पोटात दुखू लागल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र शिंदे, जालिंदर शिंदे, शोभा शिंदे, साखराबाई जगताप, वैजंता शिंदे, सीमा शिंदे, निखिल शिंदे व निकिता लगस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास हवालदार गवळी करत आहेत.
निखिल नारायण शिंदे (वय ३,० रा भाईदास भुता चाळ, मोगरपाडा, अंधेरी, मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की लग्नविधी सुरू असताना नवरा मुलाकडील काही व्यक्तींनी नवरीस तांदूळ फेकून मारले. म्हणून मुलीचे मामा बाळू सदाशिव शेगर (रा. गोवंडी, मुंबई) त्यांना जाब विचारला असता संतोष आबाजी बाबर व ओंकार संतोष बाबर (दोघे रा, बोरगाव, ता. सातारा) यांनी बेकायदेशीररीत्या जमाव जमवून शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी मी गेलो असता संतोष बाबर, ओंकार बाबर यांच्यासह दिलीप आबाजी बाबर (मूळ रा. बोरगाव, ता. सातारा, हल्ली रा, मुंबई) व अन्य पाच ते सहा अनोळखी लोकांनी मला मारहाण केली. यामध्ये मला ढकलून दिल्याने लोखंडी सळईवर पडून डोक्याला जखम झाल्याने उपचारासाठी नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. निखिल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोरगाव पोलिसांनी संतोष बाबर, ओंकार संतोष बाबर यांच्यासह दिलीप बाबर व अन्य पाच ते सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.