विकसित भारताचा रोड मॅप दर्शवणारा केंद्रीय अर्थसंकल्प
खासदार उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया
अर्थसंकल्पात तळागाळातल्या अगदी शेवटच्या व्यक्तीचा बारकाईने विचार करण्यात आला असून शेतकरी, आदिवासी, महिला, युवा, मध्यमवर्गीय सर्वच घटकांना प्राधान्य दिले आहे. हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने सर्वजन हिताय असल्याचे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
सातारा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला केंद्र शासनाचा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या प्रवासाचा रोड मॅप दर्शवणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात तळागाळातल्या अगदी शेवटच्या व्यक्तीचा बारकाईने विचार करण्यात आला असून शेतकरी, आदिवासी, महिला, युवा, मध्यमवर्गीय सर्वच घटकांना प्राधान्य दिले आहे. हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने सर्वजन हिताय असल्याचे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात उदयनराजे यांनी आपल्या प्रामाणिक भावना या अर्थसंकल्पाच्या संदर्भाने स्पष्ट केल्या आहेत. यामध्ये नमूद आहे की, संतुलित अशा या अर्थसंकल्पाला ग्रीन बजेट, इन्फ्रा बजेट, ग्रोथ बजेट, मध्यमवर्गीयांचे बजेट आणि शेवटच्या माणसाचा हिताचा विचार करणारे आहे. या अर्थसंकल्प नुसार सुमारे दहा लाख कोटी पायाभूत सुविधांवर गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. याशिवाय राज्यांना पन्नास वर्षासाठी व्याजमुक्त कर्ज देण्यातून राज्यांना सुद्धा पायाभूत सुविधांसाठी गती देता येणार आहे. 27 कोटी लोकांना ईपीएफओ च्या कक्षेत आणल्यामुळे सामाजिक सुरक्षेचा विचार झाला आहे. नोकरदारांच्या सात लाख रुपये पर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही. त्यामुळे हा मोठा दिलासा मध्यमवर्गाला आहे. 9 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या नोकरदारांना केवळ 45 हजार, तर पंधरा लाख उत्पन्न असणाऱ्यांना केवळ दीड लाख रुपये कर भरावा लागणार आहे.
काही वस्तू व सेवा वस्तू करातील दरात कपात करण्यात आली आहे, ही पण फार मोठी उपलब्धी आहे. एकंदरीत सशक्त भारत आणि समृद्ध भारत निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शहा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचे मनापासून आभार मानतो, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रियेत शेवटी नमूद केले आहे.


