ऐन दिवाळीच्या हंगामात महाबळेश्वरमध्ये घाणीचे साम्राज्य
वनविभागाच्या हद्दीत पडणारा कचरा कोणाचा? संबंधितांवर कारवाईची मागणी
येथील नाकींदा, क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावर अज्ञातांनी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे याठिकाणी येणार्या पर्यटकांना दुर्गंधीमुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासही त्रास होत असल्याने स्वच्छ महाबळेश्वर म्हणवून घेणार्या महाबळेश्वर पालिका मुख्याधिकार्यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
महाबळेश्वर : येथील नाकींदा, क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावर अज्ञातांनी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे याठिकाणी येणार्या पर्यटकांना दुर्गंधीमुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासही त्रास होत असल्याने स्वच्छ महाबळेश्वर म्हणवून घेणार्या महाबळेश्वर पालिका मुख्याधिकार्यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळख असणारे गिरीस्थान महाबळेश्वर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गजबजून गेले आहे. राज्यासह देशातील पर्यटकांनीही निसर्गसौंदर्याचा आस्वाद लुटण्यासाठी याठिकाणी कूच केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाबळेश्वर गिरीस्थान पालिकेस स्वच्छतेसंदर्भातील राज्य व देशपातळीवर अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. यासंदर्भातील वृत्त विविध प्रसारमाध्यमांनी प्रसारित करुन महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकार्यांसह इतर अधिकार्यांनी आपली पाठ थोपटवून घेतली आहे. परंतू ‘पुढे पाठ, मागे सपाट’ या म्हणीप्रमाणे पुरस्कार मिळताच महाबळेश्वरमध्ये होणार्या घाणीच्या साम्राज्याकडे मात्र अधिकार्यांनी पाठ फिरवली आहे, असे म्हणावे लागेल. कारण महाबळेश्वर हद्दीतच असणार्या नाकींदा तसेच क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यांवर वनविभागाच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, बार व मेडिकल वाल्यांनी कचरा फेकल्यामुळे याठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. दिवाळीच्या ऐन हंगामामध्ये महाबळेश्वरमधील प्रसिद्ध पॉईंटकडे जातानाच हा कचरा पर्यटकांच्या दृष्टीस पडत आहे. तसेच या कचर्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटल्याने अनेक पर्यटकांना आपले नाक मुठीत धरुनच निसर्गाचा आस्वाद घ्यावा लागत आहे. त्यामुळे एकप्रकारे महाबळेश्वरची पर्यटकांमध्ये नाचक्की होत आहे. नाकींदा तसेच क्षेत्र महाबळेश्वरमध्ये फेकला जाणारा कचरा नक्की कोणी उचलावा, या दुविधेमध्ये महाबळेश्वर गिरीस्थान पालिका तसेच वनविभाग पडलेले आहेत. मात्र, येत्या काही तासांमध्ये हा कचरा उचलला न गेल्यास त्याबाबतची तक्रार सातारा जिल्हाधिकार्यांकडे करणार असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश बावळेकर यांनी दिली.
दरम्यान, वारंवार महाबळेश्वरमधील नाकींदा तसेच क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यालगतच्या वनविभागाच्या हद्दीमध्ये कचरा फेकला जात असल्याने जे कचरा फेकून महाबळेश्वर येथील वनसंपदा तसेच जैवविविधतेचे नुकसान करीत आहेत, त्यांच्यावरही कठोर कारवाईची मागणी होत आहे.


