maharashtra

अजब प्रेम की गजब कहानी...

प्रेयसी पडली दुसऱ्या प्रियकराच्या प्रेमात; पहिल्या प्रेमवीरावर कारवाई

Ajab Prem Ki Gajab Kahani ...
अडीच वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात आलेल्या कोरोनाने अनेकांच्या आयुष्याची पुरती वाताहत केली. कोणाच्या कायमच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचे व्यवसाय देशोधडीला लागले. लॉकडाउन नंतर लॉकडाउन झाल्यामुळे अनेकांना आपल्या कुटुंबापासून कित्येक काळ दूर रहावे लागले. याच काळात सातारा जिल्ह्यात एका प्रेमी युगलाची अजब प्रेम की गजब कहानी सर्वांनाच पाहायला मिळाली.

सातारा : अडीच वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात आलेल्या कोरोनाने अनेकांच्या आयुष्याची पुरती वाताहत केली. कोणाच्या कायमच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचे व्यवसाय देशोधडीला लागले. लॉकडाउन नंतर लॉकडाउन झाल्यामुळे अनेकांना आपल्या कुटुंबापासून कित्येक काळ दूर रहावे लागले. याच काळात सातारा जिल्ह्यात एका प्रेमी युगलाची अजब प्रेम की गजब कहानी सर्वांनाच पाहायला मिळाली.
लॉकडाउनमुळे संपर्क नाही, भेट नाही... याच काळात ती प्रेयसी दुसऱ्या प्रियकराच्या प्रेमात पडल्यामुळे पहिल्या प्रियकराने प्रेयसीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत ती प्रेयसी जायबंदी झाली आणि पहिल्या प्रियकराला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले.
सातारा जिल्ह्यातील अशीच एक घटना समोर आली आहे. या कहाणीमध्ये युवक व युवती यांच्या प्रेमाची सुरुवात साधारण ३ वर्षांपासून झालेली आहे. तो फलटण तालुक्यातील तर ती युवती सातारची. ती कॉलेजला तो मात्र कमी शिकलेला पण कामावर जात असलेला. आठवड्यातून तो किमान दोनवेळा तरी तिला भेटायला हमखास सातार्‍याला येत असे. प्रेमाच्या आणाभाका घेत कॅफे, हॉटेल करत अनेकदा यवतेश्वर घाट, कासची देखील सफर केली. लग्नाची स्वप्ने पाहून पुढे कसे जायचे अशा चर्चाही त्यांच्या झडल्या. वर्ष-सव्वावर्ष गेल्यानंतर मात्र अचानक कोरोना आला.
कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने या दोघांच्या भेटीगाठीवर मर्यादा आल्या. सुरुवातीला कोणालाच अंदाज नसल्याने कोरोनाची परिस्थिती जाईल व आपण पुन्हा भेटू या आशेवर ५ ते ६ महिने गेले. लॉकडाउनमुळे प्रेमवीराचा कामधंदा गेल्याने त्याच्यावर अस्मानी संकट कोसळले. त्यातच प्रेयसीला भेटता येत नाही याचे शल्य त्याला खायला उठत होते. अशात मोबाइल हा यांना देवासारखा धावून आला. मात्र प्रेयसीने अनेक कारणे सांगत मोबाईलवरील संपर्क कमी करत ती मेसेज टाळू लागली. यामुळे प्रेमवीर हतलब झाला.
प्रेयसी पहिल्यासारखे बोलत नाही, मेसेज करत नसल्याची शंका आल्याने त्याने वाद घातला. यावर प्रेयसीने हिसका दाखवत त्याची लायकी काढली.
वादविवादानंतर दोन-तीन भेटीही दोघांमध्ये झाल्या. मात्र योग्य पॅचअप झालेले नव्हते. चौथ्या भेटीमध्ये मात्र तिने थेट ‘ब्रेकअप’चा पवित्रा घेतला. याचवेळी प्रेमवीराला मारहाण झाली. ही मारहाण करणारा तो युवक दुसरा कोणी नव्हता तर त्याच्या प्रेयसीचा मित्रच होता. यातूनच मग प्रेमवीराला गेल्या सहा महिन्यातील कमी बोलण्याचे नेमके कारण उमगले. यातूनही प्रेमवीराने हार न मानत प्रेयसीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रेयसी काही केल्या पॅचअपला तयार होत नव्हती. यातूनच प्रियकराने तिला भेटायला बोलावून तिला दुचाकीवरुन पळवले. या गडबडीत मात्र ती प्रेयसी जायबंदी झाली आणि प्रकरण पोलिस ठाण्यात गेलं. पोलिसांनी जाबजबाब घेतल्यानंतर त्यांनाही नेमक्या ‘ट्विस्ट’चा अंदाज आला. अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल होवून पहिल्या प्रेमवीरावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.