युवकाचा मृत्यू अपघाती नव्हे, तर खूनच!
पाच संशयित जेरबंद; खंडाळा पोलिसांची दिमाखदार कारवाई
प्रशांत प्रकाश पवार (वय 23, रा. अनवडी ता. वाई) या युवकाचा अपघाती नव्हे तर त्याचा मारहाणीत खून झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मारहाण करणारे पारगाव, खंडाळा जि. सातारा येथील यादव भावकी असून मृत युवक नात्याने त्यांचा पाहुणा लागतो. पोलिसांनी 5 संशयित आरोपींना अटक केली असून त्यातील दोघेजण माजी सैनिक आहेत.
सातारा : प्रशांत प्रकाश पवार (वय 23, रा. अनवडी ता. वाई) या युवकाचा अपघाती नव्हे तर त्याचा मारहाणीत खून झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मारहाण करणारे पारगाव, खंडाळा जि. सातारा येथील यादव भावकी असून मृत युवक नात्याने त्यांचा पाहुणा लागतो. पोलिसांनी 5 संशयित आरोपींना अटक केली असून त्यातील दोघेजण माजी सैनिक आहेत.
हणमंत उर्फ प्रकाश संपत यादव (वय 35), सचिन नामदेव यादव (वय 43), अभिषेक उर्फ गौरव शिवाजी यादव (वय 22), विजय गणपत यादव (वय 39), कुणाल भानुदास यादव (वय 23, सर्व रा. पारगाव ता.खंडाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील हणमंत यादव व सचिन यादव हे माजी सैनिक आहेत. याबाबतची माहिती सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे.
अधिक माहिती अशी, दिनांक 12 रोजी संशयित आरोपीसह इतरांनी प्रशांत पवार, ओंकार पवार व या दोघांचे वडील प्रकाश पवार यांना पारगाव येथील रानातील शेड, पळशी ता.खंडाळा अशा ठिकठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रशांत पवार या युवकाचा याचा मृत्यू झाला. या घटनेत ओंकार पवार व प्रकाश पवार हे देखील जखमी झाले. प्रशांतचा मृत्यू झाल्यानंतर संशयितांनी काही ठिकाणी सल्लामसलत केली. त्यानंतर संशयित आरोपींनी जखमी ओंकार व प्रकाश पवार यांना जीवे मारण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले. तसेच प्रशांत याचा मृत्यू अपघातात झाला आहे अशी खोटी तक्रार पोलिस ठाण्यात देण्यास भाग पाडले.
या सर्व घटना घडामोडीमुळे घाबरलेल्या ओंकार पवार याने वडिलांचा व स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अपघाताची खोटी तक्रार पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी त्यावरुन अपघाताचा गुन्हा देखील नोंद केला. मात्र दुसरीकडे शवविच्छेदन अहवाल पोलिसांची पोलिसांची शंका बळवल्याने हा अपघात नसून प्राथमिक तपासात खून झाल्याचे समोर आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषन (एलसीबी) व खंडाळा पोलिसांनी तपासाला गती दिल्यानंतर खंडाळा पोलिसांना त्यात यश आले. दि. 12 तारखेपासून या घटनेतील संशयित आरोपी पसार झाले होते. बुधवारी खंडाळा पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेवून अटक केल्यानंतर त्यांनी खूनाची कबुली दिली. पोलिसांच्या तपासामध्ये वैष्णवी शिंदे (रा.पारगाव), आशा गोळे (रा.पळशी ता.खंडाळा), आशा मोरे (रा.वाण्याचीवाडी ता.खंडाळा) या महिलांचाही समावेश असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अद्याप खुनाचे नेमके कारण समोर आले नसून पोलिस कोठडी घेतल्यानंतर चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्हाडे, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, खंडाळा पोनि महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शंकर पांगारे, संजय धुमाळ, सुरेश मोरे, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, सचिन वीर यांनी केली आहे.


