सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असणार्या काही गावांत गुरूवारी रात्री एकाच वेळी 21 बंद घराच्या घरफोडी करून रोख रक्कम, सोने आदी साहित्य लंपास केले असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत जावळी तालुक्यातील करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी आणि वरोशी या पाच गावातील एकूण 21 बंद घरे फोडली असल्याचे उघडकीस आले आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असणार्या काही गावांत गुरूवारी रात्री एकाच वेळी 21 बंद घराच्या घरफोडी करून रोख रक्कम, सोने आदी साहित्य लंपास केले असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत जावळी तालुक्यातील करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी आणि वरोशी या पाच गावातील एकूण 21 बंद घरे फोडली असल्याचे उघडकीस आले आहे.
ही घरफोडी मध्यरात्री झाली असून चोर लाखो रुपयांची रोख रक्कम आणि साहित्य घेऊन पसार झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे जावळी तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान हा सर्व प्रकार होत असतानाच जावली तालुक्यातील चोरांबे गावांत चोरीचा प्रयत्न फसून गावाच्या सी. सी. टी. व्ही. मध्ये चोरटे कैद झाले आहेत. आज सकाळी सातच्या दरम्यान याची माहिती मेढा पोलिसांनाच समजताच सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी घटनास्थळी भेटी देवून तपास गतिमान केला असून श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे.
जावळीत एकाच रात्रीत एकाच वेळी 21 घरफोड्या होण्याचा मोठी घटना घडली असून पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान अनेक गावात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्यामुळे अशा चोर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. या घरफोड्यांमध्ये हत्या, हल्ला असा अनुचित प्रकार घडला नसला तरी ही टोळी मोठी असणार आहे. त्यांनी बंद घरांना लक्ष्य केले असले तरी त्यांचे टाळे तोडणे, घरातील तिजोरी फोडणे, त्यातील साहित्य अस्ताव्यस्त करणे यासाठी त्यांनी अत्याधुनिक साहित्याचा वापर केल्याचा अंदाज आहे.
या घरफोडीत चोरांनी करंजेमधील दोन घरे, सावलीत दोन घरे, आसणीत आठ घरे, भोगवलीत दोन घरे, पुनवडीत एक घर, केडंबेत तीन घरे, वाळंजवाडीत एक घर व वरोशीत एक घर अशी 21 घरे एका रात्रीत फोडून लूट केली आहे. यामध्ये किती कोणाचे नुकसान झाले आहे हे नेमके समजू शकले नसले तरी लाखोचा ऐवज लंपास झाल्याचा अंदाज आहे.


