maharashtra

झुपकेदार मिशांची सातार्‍यात अमृत महोत्सवी मिश्किली

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते कवी अशोक नायगावकर यांचा ह्द्द सत्कार

हरवत चाललेली मराठमोळी संस्कृती, प्रत्येक ठिकाणी सुरू असलेला भ्रष्टाचार, आधुनिक किचन घराची व्यवस्था, आणि बायको आधी प्रेयसी मिळता मिळता राहून गेली, अशा अनेक सामाजिक आणि आयुष्याच्या उलथापालथी वर नर्मविनोदी शैलीने नेमके बोट ठेवत हास्यकवी अशोक नायगावकर यांनी सातारकरांना खळखळून हसविले.

सातारा : हरवत चाललेली मराठमोळी संस्कृती, प्रत्येक ठिकाणी सुरू असलेला भ्रष्टाचार, आधुनिक किचन घराची व्यवस्था, आणि बायको आधी प्रेयसी मिळता मिळता राहून गेली, अशा अनेक सामाजिक आणि आयुष्याच्या उलथापालथी वर नर्मविनोदी शैलीने नेमके बोट ठेवत हास्यकवी अशोक नायगावकर यांनी सातारकरांना खळखळून हसविले.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा व सातारा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अशोक नायगावकर यांचा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते पंच्चाहत्तरी निमित हृद्य सत्कार व प्रकट मुलाखत असा दुहेरी शर्करा योग शाहू कला मंदिराच्या व्यासपीठावर जुळून आला. यावेळी भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिखर कार्यकारिणीचे अध्यक्ष मिलिंद जोशी, मसाप शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे. अध्यक्ष हरिष पाटणे, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, मसापचे मार्गदर्शक किशोर बेडकीहाळ इ मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सुमारे दीड तासाच्या प्रकट मुलाखतीत नायगावकरांनी केलेल्या खुसखुशीत शैलीदार मांडणीत सातारकरांना खळखळून हसवत मराठी भाषा पंधरवड्याचा ’बहारदार समारोप केला. विनोद कुलकर्णी व हरिष पाटणे या द्वयींच्या थेट प्रश्नांना नायगावकरी शैलीत मिळालेली उत्तरे सातारकरांची दाद मिळवून गेली. मूळचा वाईकर पण पोटापाण्यासाठी बँकेच्या नोकरीसाठी थेट मुंबईत पोहोचलो आणि 31 वर्ष बँक ऑफ बडोदा येथे स्टोअर किपर ते कॅशियर अशी नोकरी केली. मात्र कृष्णेच्या पाण्यावर पिंड पोसला गेल्याने सामाजिकतेचा तिरकस इरसालपणा कवितेत प्रतिबिंबित झाल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या पिढीला पूर्वीच्या कवींनी वाढवलेली प्रतिमांची उंची समजत नाही. कविता म्हणजे आयुष्यभराच्या संचिताची उपासना असते, कविता आतून यावी लागते. पूर्वी पाण्यासाठी आंदोलने झाली शंभर वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पाण्यासाठी हौद खुले केले मात्र माणसाने अविश्वासापोटी पाण्याला बाटलीबंद केल्याची कोपरखळी त्यांनी लगावली. भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांनी आपल्या मनोगतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी अशोक नायगावकर यांनी जाकिट लोकप्रिय केले. तोच मुद्दा पकडून नायगावकर म्हणाले उगाच त्यावरून उभयतांमध्ये वाद नको नाही तर घरी ईडी वगैरे यायची आणी आली तरी त्यांना सुद्धा मी नक्की कविताच ऐकवेल या अस्सल नायगावकरी फटकार्‍यांना सातारकरांनी हसून दाद दिली.
वाईतील सांस्कृतिक वातावरण आणि विश्वकोशातील ग्रंथालयाने मला समृध्द केले. सुरवातीला भाव कविता लिहायचो, मुंबईत आल्यावर नामदेव ढसाळांशी मैत्री झाली मुंबईच्या अनेक झोपडपट्टया फिरलो समाजातील दुःख पाहून सामाजिक कवितांकडे वळलो अशी आठवण नायगावकरांनी सांगितली. मिशा आणि हशा हे तुमच्या बाबतीत समीकरण झालं आहे यावर नायगावकर म्हणाले माझ्या मिशांची एक ठेवणं आहे तुम्हाला सांगतो असे म्हणत होणारे माझे हातवारे ही संवाद शैली रसिकांना आवडली आणि एकच कवितासंग्रह नावावर असणारा हा कवी इतका लोकप्रिय झाला याचेच मला आश्चर्य वाटते. नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोलली जात आहे दुधी भोपळ्याची यासह बाराखडीची आणि दिग्गज कवींच्या भावावस्थेची नायगावकरांनी सादर केलेल्या कविता सातारकरांच्या दाद मिळवून गेल्या. सातारकरांनी माझा माझ्या मातीतला केलेला हृदयपूर्ण सत्कार माझ्यासाठी भारतरत्ना इतका थोर आहे अशी भावपूर्ण प्रतिक्रिया या वेळी अशोक नायगावकर यांनी दिली.