maharashtra

खोके सरकारच्या काळात राज्यात दारूचीच दुकाने वाढली

खासदार सुप्रिया सुळे यांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांना टोला

राज्यातील खोके सरकार हे अत्यंत संवेदनशील सरकार आहे. यांच्या काळामध्ये शाळांची संख्या लक्षणीय पद्धतीने घटत चालली असून दारूची दुकाने मात्र वाढत चालली आहेत. या सरकारचा राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय एकही दिवस जात नाही, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

सातारा : राज्यातील खोके सरकार हे अत्यंत संवेदनशील सरकार आहे. यांच्या काळामध्ये शाळांची संख्या लक्षणीय पद्धतीने घटत चालली असून दारूची दुकाने मात्र वाढत चालली आहेत. या सरकारचा राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय एकही दिवस जात नाही, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबवडे येथे स्वाभिमान सभेसाठी आयोजित कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. कार्यक्रमास जाण्यापूर्वी येथील शासकीय विश्रामगृहांमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडीच्या कविता म्हेत्रे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे, इत्यादी उपस्थित होते
खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली.
त्या म्हणाल्या, सध्या राज्यापुढे अनेक आव्हाने उभी आहेत. हे सरकार इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी मध्ये व्यस्त आहे. राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय खोके सरकारचा कोणताही दिवस सुरू होत नाही. या खोके सरकारने जनकल्याणाची कोणती कामे केली ते सांगावे. या सरकारच्या काळात शाळा कमी होऊन दारूचे दुकाने वाढली आहेत, असा अप्रत्यक्ष टोला राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना त्यांनी लगावला.
तसेच आमदार शशिकांत शिंदे यांना त्यांनी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. शासकीय विश्रामगृहांमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील व रमेश उबाळे यांनी सुप्रिया सुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पत्रकार परिषदेनंतर सुप्रिया सुळे यांनी सदर बाजार येथील भारत माता मंडळाच्या दुर्गा देवीचे दर्शन घेऊन देवीची आरती केली.