शेतक-यांवरील गुन्हे मागे घ्या : खा.श्रीनिवास पाटील लोकसभा सभागृहात सरकारचे लक्ष वेधले
By esahas.com web team Fri 5th Feb 2021 09:01 am
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी विरोधी खासदारांनी लोकसभेच्या सभागृहात गुरूवारी केली. यामध्ये साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुध्दा अन्य सहका-यांसोबत सहभाग नोंदवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. हे गुन्हे मागे घ्या असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन व काळा मास्क घालून त्यांनी ही मागणी केली.
कराड : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घ्या असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन व काळा मास्क घालून अन्य खासदारांसोबत उभे राहत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न खा.श्रीनिवास पाटील यांनी गुरूवारी लोकसभेत केला. दिल्लीच्या सीमांवर मागील 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. यात काही शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. या भागात पावसाने हजेरी लावली असून थंडी देखील वाढली आहे. थंड वारे व पाऊस यांमुळे शेतकऱ्यांना जीवघेणा त्रास होऊ नये यासाठी सरकारने यातून लवकरात लवकर मार्ग काढावा अशी आमची मागणी असल्याचे खा.श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. आंदोलनकर्ते शेतकरी कोणाचे ना कोणाचे तरी भाऊ, पती, पुत्र आहेत. या आंदोलनात महिलाही सहभागी झाल्या आहेत. आपल्याच बांधवांसोबत हा असा दुजाभाव न दाखवता सरकारने यावर लवकर तोडगा काढावा. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता जन-आंदोलनाचे स्वरूप आले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने लवकरात लवकर यावर मार्ग काढावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली.