पोलीस असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाची 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : पोलीस असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाची 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 8 ऑक्टोबर रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास विलास नामदेव जाधव वय 67 रा. गुरसाळे, ता. खटाव हे दुचाकीवरून गुरसाळे गावी जात असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकी वरील एकाने जाधव यांची गाडी थांबवून आम्ही पोलीस आहे. आम्ही वडूज शहरांमध्ये काही लोकांच्या जवळ असणारा गांजा पकडला आहे. त्या अनुषंगाने आम्ही लोकांना चेक करीत आहोत, असे म्हणून जाधव यांना त्यांच्याकडील साहित्य गाडीच्या सीटवर ठेवा, असे सांगितले. जाधव यांनी त्यांच्या जवळील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रुमालात बांधून सीटवर ठेवले. त्याच वेळेस गाडीच्या डिकीत काय आहे, असे सांगून जाधव यांना गुंतवून ठेवून, हातचलाखी करून जाधव यांचे 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लांबवले. या घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पो. हवा. ओंबासे अधिक तपास करीत आहेत.


