सातारा पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा अमृत योजनेतील तृतीय पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. शहराचा हा लौकिक कायम राखण्यासाठी शाहूनगर कार्यक्षेत्रामध्ये उद्योजक सागर भोसले यांचे जय सोशल फाउंडेशन ऐन पावसाळ्यात कामाला लागले आहे. चला शाहूनगर परिसर स्वच्छ ठेवूया हा संदेश घेऊन या फाउंडेशनचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार आहेत.
सातारा : सातारा पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा अमृत योजनेतील तृतीय पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. शहराचा हा लौकिक कायम राखण्यासाठी शाहूनगर कार्यक्षेत्रामध्ये उद्योजक सागर भोसले यांचे जय सोशल फाउंडेशन ऐन पावसाळ्यात कामाला लागले आहे. चला शाहूनगर परिसर स्वच्छ ठेवूया हा संदेश घेऊन या फाउंडेशनचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ तातडीने सुरू करण्यात आला असून दोन घंटागाड्या आणि एक ट्रॅक्टर परिसरामध्ये स्वच्छतेसाठी फिरवला जात आहे.
या स्वच्छता मोहीमेमध्ये फाउंडेशनचे 15 सदस्य सक्रिय झाले असून ऐन पावसाच्या रिपरिपीत सोशल फाउंडेशनची स्वच्छता मोहीम सुरू आहे. सातारा शहरा लगतच्या दक्षिण भागातील शाहूनगर परिसर हा विस्ताराच्या दृष्टीने मोठा असून येथे तब्बल पावणे पाच हजार लोकसंख्या आहे. बराचसा भाग हा डोंगर उतारावरचा असल्यामुळे पायाभूत सुविधांची अद्यापही तेथे तीव्र टंचाई आहे. ही अडचण ओळखून जय सोशल फाउंडेशन आणि सागर भोसले हे समीकरण तेथे सक्रिय झाले आहे. फाउंडेशन च्या वतीने शिवनेरी कॉलनी , हिल टॉप सोसायटी, एस.टी. कॉलनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण परिसर, कामाठीपुरा, रामराव पवार नगर, गोळीबार मैदान वसाहत ,जगतापवाडी, गुरुकुल शाळा परिसर या सर्व भागांमध्ये दोन घंटागाड्या आणि एक ट्रॅक्टर सोशल फाउंडेशनच्यावतीने फिरवला जात आहे. या स्वच्छता मोहिमेत घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे सुद्धा आवाहन करण्यात आले आहे. स्वयंसेवकांनी स्वतः घरोघरीचा कचरा गोळा करून तो सोनगाव डेपोला पोहोचवण्याचे काम हाती घेतले आहे.
गेल्या तीन दिवसापासून सातारा शहरांमध्ये पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. लोकांना घंटागाडी पावसाळ्यात येत नसल्यामुळे कचरा साठवून ठेवावा लागत आहेत. त्याचे उत्तर जय सोशल फाउंडेशनने शोधले असून घरोघरी कचरा गोळा करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याचा कोणताही गाजावाजा न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना सागर भोसले म्हणाले, राज्यस्तरीय स्वच्छतेचा पुरस्कार सातारा शहराने घेतला आहे. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सातारकरांची असूनच त्याकरता जे सोशल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी आपला कचरा कागदी पिशवीमध्ये गोळा करून ठेवावा तो कचरा इतर कोठेही रस्त्यावर टाकू नये. तो कचरा योग्य ठिकाणी पोहोचण्याची जबाबदारी जय सोशल फाउंडेशनने घेतली आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून शाहूनगर परिसरात ही मोहीम राबवली जात असून ज्यांच्याकडे घंटागाडी वेळेत येणार नाही त्या नागरिकांनी 9021115004 या क्रमांकावर संपर्क करावा. अगदी घरातला सुद्धा कचरा आम्ही घेऊन जाऊ असे आवाहन सागर भोसले यांनी केले आहे. शाहूनगर परिसरातील जय सोशल फाउंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत या भागातील मोठे ठेकेदार अमित महिपाल यांनी आपल्या घराचे कॅमेरे चार भिंती रोडच्या दिशेने वळवले आहेत. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकणारे कोण नागरिक आहेत, यांचा सुद्धा शोध घेतला जात आहे. त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिक दंड केला जाईल असा इशारा फाउंडेशनच्यावतीने देण्यात आला आहे.


