जिल्ह्यातील दिव्यांगांचे संसार उभे करण्याचे काम करा
आमदार बच्चू कडू यांच्या अधिकार्यांना स्पष्ट सूचना
आमदार खासदारचे एखादे काम कमी करा. पण आपल्या जिल्ह्यातील दिव्यांगांचे संसार उभे करण्याचे काम करा. आमच्यासाठी दिव्यांग बांधव हे पंढरीच्या विठ्ठलाप्रमाणे आहेत, असे स्पष्ट मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त करत पंधरा दिवसात शासन दिव्यांगांच्या दारी पोहचले पाहिजे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
सातारा : हिंदुस्थानात राजकारणामध्ये जातीचा, धर्माचा प्रभाव जास्त आहे. हल्लीची राजकीय मंडळी जातीला, धर्माला खुश ठेवण्यासाठी काम करतात. आमचे दिव्यांग बांधव तर सर्वच जातीचे. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, असा टोला सध्याच्या राजकीय मंडळींना लगावत आमदार बच्चू कडू यांनी आपल्या आमदार खासदारचे एखादे काम कमी करा. पण आपल्या जिल्ह्यातील दिव्यांगांचे संसार उभे करण्याचे काम करा. आमच्यासाठी दिव्यांग बांधव हे पंढरीच्या विठ्ठलाप्रमाणे आहेत, असे स्पष्ट मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त करत पंधरा दिवसात शासन दिव्यांगांच्या दारी पोहचले पाहिजे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित दिव्यांग अभियान या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, समाजकल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे, प्रकल्प संचालक संतोष हराळे, समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, दिव्यांगांच्या हक्कासाठी मी पंधरा वर्ष लढा दिला आहे. 200 गुन्हे अंगावर आहेत. 3 वर्षाची सजाही झाली आहे. वरच्या कोर्टात गेल्यामुळे मी आता येथे बोलतो आहे. हा बच्चू कडू मतासाठी राजकारण करत नाही. तर एक दिव्यांगांची सेवा म्हणून काम करतो आहे. आजही 75 वर्ष झाली दिव्यांग समस्यांच्या गर्तेत आहे. दोन पाय असलेले दोन डोळे असलेले काम करु शकतात. पण दिव्यांग दिव्यांग व्यवसायिकांना करात तीन टक्के सवलत दिली गेली पाहिजे. त्यांना शहरात व्यवसायासाठी क्षेत्र उपलब्ध करुन दिले पाहिजे. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जावून अधिकार्यांनी माणूसकी म्हणून काम करा. मी किती वेळा कायदा तोडला. सीईओंच्या खुर्चा फोडल्या. केबीन बंद केली. चांगल्यासाठी कायदा बाजूला ठेवा, असे सांगत ते म्हणाले, 1995 चा कायदा सहा देशांनी स्वीकाला परंतु त्यांचा शासन निर्णय निघाला नव्हता. 2016 ला पुन्हा कायदा झाला. त्याचा शासन निर्णय निघाला आहे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्रे शक्तीस्थळे झाली पाहिजेत. जिल्ह्यातील एकही दिव्यांग युआयडी कार्डपासून वंचित रोहता कामा नये, तीन महिन्यात यंत्रणा कामाला लावा, अशा सुचना त्यांनी दिल्या. पुढे ते म्हणाले, मी 27 जिल्हे फिरलो आहे. मंत्र्यांच्या सचिवांना अजूनही दिव्यांगांचे प्रकार माहिती नाहीत. त्यांना बाहेर काढा असे मी मुख्यमत्र्यांना सांगितले आहे. सातारा जिल्ह्याच्या मातीत दम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसते तर दिव्यांग मंत्रालय झाले नसते. आम्हाला पुन्हा रस्त्यावरची लढाई लढावी लागली असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकार्यांचे कौतक करत प्रशासनाची चक निदर्शनास आणून दिली.
सातारा जिल्ह्यात अनेक दिव्यांगांना प्रमाणपत्र नाही. टक्केवारी कमी दिली जाते. त्याबाबतच्या तक्रारी आमदार बच्चू कडू यांना व्यासपीठावर गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनीच आपल्या भाषणात कलेक्टर जितेंद्र डुडी यांचे कौतुक करत तीनच बोटे नसलेल्या दिव्यांगांंना प्रमाणपत्र दिले पाहिजे अशी स्वतः कबुली बच्चू कडू यांच्याकडे दिल्याने प्रशासनाची चुक आमदार बच्चू कडू यांनी निदर्शनास आणू देत ते म्हणाले, 75 वर्षाचा बॅकलॉक भरुन काढायचा आहे, असेही त्यांनी सांगितले. आमदार खासदाराची घरे उभी राहतात. कलेक्टरांची घरे उभी राहतात. आमच्या दिव्यांगांची घरे मात्र गेल्या 75 वर्षात तशी आहेत. या जिल्ह्यात 75 टक्के दिव्यांगां लाभार्थी वंचित असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. दरम्यान, त्यांनी उस्मानाबादच्या कलेक्टरांनी दिव्यांगांच्या मेळाव्यात जेवण वाढल्याने दिव्यांगांना आनंद झाल्याचे बोलून दाखवले.
देवाला भेटण्यासाठी दिव्यांग व्यासपीठावर
दिव्यांगांचा देव म्हणूनच आमदार बच्चू कडू यांची ओळख अवघ्या महाराष्ट्रात आहे. सातार्यात ते आल्याने जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून दिव्यांग बांधव आले होते. त्यांना भेटण्यासाठी चक्क बाळू ओव्हाळ नावाचा दिव्यांग आपल्या मागण्यांची फाईल घेवून घसरत घसरत व्यासपीठावर पोहचला. त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या हातात फाईल दिली. खासदार श्रीनिवास पाटील यांनी बाळू ओव्हाळ यांना जवळ बसवले. एवढेच नाही तर आमदार बच्चू कडू यांनी वैयक्तिक दिव्यांगांच्या तक्रारी ऐकून घेत उपस्थित अधिकार्यांना सुचना केल्या. त्यामुळे दिव्यांगांच्या प्रश्न निकाली लागले.
दिव्यांगांच्या अडचणी घेतल्या जाणून
सातारा येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान हा कार्यक्रम संपल्यानंतर आ. बच्चू कडू हे सभागृहातील प्रत्येक दिव्यांगांपुढे जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत निवेदन घेत होते. खुर्चीवर बसलेला दिव्यांग बांधव आणि त्यांच्या बरोबरबरीने आलेले नातेवाईक हे बच्चू कडु यांना माहिती द्यायचे. त्याप्रमाणे कडू निवेदन घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना करत होते. जवळपास अडीच तास कडू यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्याने दिव्यांग बांधवात समाधानाचे वातावरण होते.
पोटभर जेवण केले दिव्यांग बांधवांनी
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणच्या अधिकारी डॉ. सपना घोळवे यांनी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला आलेल्या दिव्यांग बांधवांना जेवणाची सोय केली होती. जागेवर पोहोच करुन जेवण दिले जात होते. पोटभर जेवण मिळाल्याने आलेले दिव्यांग बच्चू भाऊंचे आभार मानत होते.
बच्चू भाऊ दिव्यांगाच्या गाडीवर
सातार्यात आमदार बच्चू कडू यांचे आगमन होताच शासकीय विश्रामगृह येथे एकच भिडू बच्चू कडू असा जयघोष उपस्थित प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिला. दरम्यान, आमदार बच्चू कडू हे दिव्यांग असलेल्या प्रशांत बगले यांच्या दिव्यांग गाडीवर पाठीमागे बसले. सर्व दिव्यांगांच्या गाड्यांची रॅली घोषणाबाजी करत जिल्हा परिषद बांधकाम भवन मार्गे सभागृहात पोहचली. सायंकाळी बच्चू भाऊ यांनी चारभिंती येथे जावून हुतात्मा स्मारकास अभिवादन केले.


