पळसावडे, ता. सातारा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावरून रामचंद्र जानकर याची आज वनविभागाने हकालपट्टी केल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली.
सातारा : पळसावडे, ता. सातारा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावरून रामचंद्र जानकर याची आज वनविभागाने हकालपट्टी केल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पर्यावरणाचा ऱ्हास थांबून समतोल राखला जावा यासाठी जंगल व गडकोट पर्यटन स्थळाला विकसित करण्यासाठी शासनाने प्रथम वनहक्क समिती, तद्नंतर वनसंरक्षक समित्या स्थापन केल्या होत्या. प्रवीण परदेशी यांनी वन विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर २०११ साली महाराष्ट्रात ठिकठिकाणी संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या.
२०११ पासून पळसावडे, ता. सातारा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून तेथीलच रामचंद्र गंगाराम जानकर हा कामकाज पाहत होता. दरम्यान दि. १७ जानेवारी २०२२ रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास पळसावडे येथील वनक्षेत्र हद्दीत महिला वनरक्षक सिंधू बाजीराव सानप व त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे हे कर्तव्य बजावत असताना सिंधू बाजीराव सानप यांना रामचंद्र जानकर व त्यांच्या पत्नीने बेदम मारहाण केली होती. काही तासातच जानकर दाम्पत्याला पोलिसांनी शिरवळ येथून अटक केली होती. या घटनांच्या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन वन विभागाने पळसवडे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदावरून रामचंद्र जानकर याची आज हकालपट्टी केली. त्याबाबतचे पत्र संयुक्त वनव्यवस्थापन समितीला पाठवण्यात आले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.


