मायणी (ता. खटाव) येथे मागासवर्गीय मृत व्यक्तीची बनावट सही व कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याच्या गुन्ह्यात दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्याबाबत अटकपूर्व जामीन अर्ज वडूज न्यायालयाऐवजी अन्य न्यायालयात चालवण्यासाठी भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्यावतीने सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तो फेटाळला आहे. आता जामिनाबाबत वडूज न्यायालयातच सुनावणी होणार आहे.
सातारा : मायणी (ता. खटाव) येथे मागासवर्गीय मृत व्यक्तीची बनावट सही व कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याच्या गुन्ह्यात दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्याबाबत अटकपूर्व जामीन अर्ज वडूज न्यायालयाऐवजी अन्य न्यायालयात चालवण्यासाठी भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्यावतीने सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तो फेटाळला आहे. आता जामिनाबाबत वडूज न्यायालयातच सुनावणी होणार आहे.
यापूर्वी सातारा न्यायालयात त्यावर सोमवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांनी हा अर्ज फेटाळला. त्यामुळे जामीन अर्जावरील सुनावणी वडूज येथील न्यायालयात होणार आहे. यावर शिक्कामोर्तब झाला आहे. जमीन मायणीची, गुन्हा दाखल झाला दहिवडीत आणि जामीनाचे कामकाज होणार वडूज न्यायालयात असा त्रिकोण या घटनेत पाहण्यास मिळणार आहे. खटाव तालुक्यातील मायणी येथील भिसे यांचा मृत्यू झाला असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून आणि बोगस कागदपत्रे तयार करून त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी,ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) या त्रिकुट विरोधात महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद नोंदवली आहे. भिसे या नावाने सह्या करणाऱ्या संजय काटकरला या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान, आ. गोरे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालया ऐवजी इतरत्र घेण्याची मागणी करणारा अर्ज त्यांचे वकील संदेश गुंडगे यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांसमोर सादर केला होता. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीत आ. गोरेंचे वकील संदेश गुंडगे, जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी आणि फिर्यादीचे वकील टी. एस. माळी यांनी युक्तिवाद केला.


