टेंभू प्रबोधनाचे ज्ञानतीर्थ म्हणून गौरवले जाईल : डॉ. यशवंत पाटणे
इंद्रधनु फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आगरकर पुरस्कार प्रदान
इंद्रधनु विचारमंच फौंडेशनने टेंभू येथे आगरकरांच्या नावे पुरस्काराचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या प्रेरणादायी उपक्रमामुळे गुणवंत पत्रकारांबरोबरच टेंभू हे प्रबोधनाचे ज्ञानतीर्थ म्हणून गौरवले जाईल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केला.
कराड : स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणांचा ध्यास घेतलेले थोर सुधारक गोपाळ गणेश आगरकर हे पत्रकारितेच्या इतिहासातील लखलखते पान आहे. समाजाला मानसिक गुलामीत ठेवणार्या रूढी पंरपरा विरूध्द त्यांनी आवाज उठविला. अस्पृस्यता, वर्णवर्चस्वामुळे भरडल्या जाणार्या घटकांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी प्रस्थापित वर्गाशी वैचारिक लढा दिला. त्यांचा आगरकरी बाणा पुढे चालवला जावा म्हणून इंद्रधनु विचारमंच फौंडेशनने टेंभू येथे आगरकरांच्या नावे पुरस्काराचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या प्रेरणादायी उपक्रमामुळे गुणवंत पत्रकारांबरोबरच टेंभू हे प्रबोधनाचे ज्ञानतीर्थ म्हणून गौरवले जाईल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केला.
टेंभू ता. कराड येथे इंद्रधनु विचारमंच फौंडेशनच्या वतीने थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची १६६ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी फॊंडेशनच्या वतीने राज्यातील पत्रकारांना ‘गोपाळ गणेश आगरकर सुधारक पत्रकारिता पुरस्कार २०२२’ ने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेंभूचे सरपंच युवराज भोईटे होते. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, कराडचे तहसीलदार विजय पवार, कराड पंचायत समिती गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, उद्योजक रामकृष्ण वेताळ, सुधारक शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा माने, बापूसाहेब जाधव, आशिष तागडे, अर्जुन धस्के, तुषार तपासे आणि स्नेहा मांगुरकर यांना यावर्षीचा गोपाळ गणेश आगरकर सुधारक पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, आगरकर प्रखर बुध्दीवादी, मानवतावादी आणि नितीमान संपादक होते. मानव धर्माला अभिप्रेत असे विवेकाचे अधिराज्य निर्माण व्हावे, हा त्यांचा आग्रह होता. सध्या वाढत्या धर्मद्वेषामुळे आणि अतिरेकी चंगळवादामुळे समाजजीवन विस्कटले जात आहे. हिन राजकारणामुळे संविधानाला तडे जात आहेत. मतदारांना पाच वर्षांसाठी गृहित धरून राज्यकर्त्यांचे सत्तेचे खेळ सुरू आहेत. जनतेच्या पोटापाण्याच्या प्रश्नापेक्षा वादग्रस्त बोलण्याचा कमालीचे महत्व प्राप्त दिले जात आहे. समाजाच्या सदसद बुध्दीला ग्लानी आली आहे. सामान्य माणूस एका गुंगीत जगतो आहे. त्याला गदागदा हालवून सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे गरजेचे आहे. समाजाला जागे करण्याची शक्ती पत्रकारांच्या लेखणीत आहे. पत्रकारांनी लोकशाही मूल्यांच्या सबलीकरणासाठी आगरकरी बाणा जपला पाहिजे.
सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात आगरकरांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. अनिष्ठ रूढी परंपरांच्या विरोधात ते आयुष्यभर लढले. त्यांचे कार्य, विचार नवीन पिढीने आत्मसात करून कार्यरत राहिले पाहिजे. आगरकरांच्या जन्मभूमीत त्यांच्या जयंती दिनी इंद्रधनु विचारमंचने पत्रकारांचा गौरव करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
सत्काराला उत्तर देताना वरिष्ठ संपादक राजा माने म्हणाले महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील पंढरी म्हणून ज्याचा उल्लेख होतो ते म्हणजे टेंभू येथील गोपाळ गणेश आगरकर यांची जन्मभूमी आहे गोपाळ गणेश आगरकर यांच्याच नावाने दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे पत्रकारितेतील आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे आगामी काळात टेंभू येथे आगरकरांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी राज्यातील सर्व पत्रकार प्रयत्नशील राहतील.
यावेळी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे म्हणाले, क्रांतिकारकांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यात गोपाळ गणेश आगरकर यांनी रुजविलेला सुधाकरवादी विचार आजच्या पत्रकारांना आदर्श घेण्यासारखा आहे. गोपाळ गणेश आगरकर यांच्या टेंभू या गावामध्ये भव्य स्मारक उभे करण्यासाठी पत्रकार संघटना सर्वतोपरी सहकार्य करेल.
यावेळी युवराज भोईटे, रामकृष्ण वेताळ यांची भाषणे झाली. ज्येष्ठ पत्रकार राजा माने व स्नेहा मांगुरकर यांनी सत्काराला उत्तर दिले.
स्वागत इंद्रधनु विचार मंचचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, संदीप चेणगे यांनी केले. प्रास्ताविक अशोक मोहने यांनी केले. प्रमोद तोडकर यांनीसूत्रसंचालन केले. माणिक डोंगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पत्रकार, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी हायस्कूलमधील आगरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.


