येथील औद्योगिक वसाहत परिसरात दुचाकी चालकाला लिफ्ट मागण्याचा बहाणा करुन, त्याला मारहाण करुन त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेवून त्याला कॅनॉलमध्ये ढकलून पळून गेलेल्या दोघांना अटक करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.
सातारा : येथील औद्योगिक वसाहत परिसरात दुचाकी चालकाला लिफ्ट मागण्याचा बहाणा करुन, त्याला मारहाण करुन त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेवून त्याला कॅनॉलमध्ये ढकलून पळून गेलेल्या दोघांना अटक करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.
विक्रम विनायक उंबरे (वय 28), किशोर साईराम जाधव (वय 27, दोघेही रा. कोडोली, ता. सातारा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 जून रोजी 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये असणार्या महाराष्ट्र स्कूटर्स या कंपनीच्या गेटसमोर अमोल बाळकृष्ण जगताप, रा. गोळीबार मैदान परिसर, कोडोली, ता. सातारा यांच्याकडून अज्ञात तीन अनोळखी इस्मानी 15 हजार रुपये किमतीचा मोबाइल व 150 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत त्यांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्यांची दुचाकी कॅनॉलमध्ये टाकून दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
त्यानुषंगाने वरिष्ठ अधिकार्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना या गुन्ह्याचा शोध लावून संशयितांना अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या. निंबाळकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला याबाबत सूचना दिल्या. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना पथकाने गोपनीय माहिती प्राप्त करुन दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली असून त्यांच्या अन्य एका साथीदाराचा शोध सुरु आहे.
ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उप निरीक्षक सुधीर मोरे, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, गणेश घाडगे, विक्रम माने, संतोष कचरे, गणेभ भोंग आणि सागर गायकवाड यांनी पार पाडली.


