कराड तालुक्यातील एका गावात 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने 54 वर्षीय आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 22 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कराड न्यायालयात जिल्हा व विशेष न्या. के. एस. होरे यांनी गुरूवारी ही शिक्षा सुनावली.
कराड : कराड तालुक्यातील एका गावात 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने 54 वर्षीय आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 22 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कराड न्यायालयात जिल्हा व विशेष न्या. के. एस. होरे यांनी गुरूवारी ही शिक्षा सुनावली.
संजीव बाबुराव चव्हाण (वय ५४) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी विशेष सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील एका गावात पिडीत अल्पवयीन मुलगी २९ जुलै २०२० रोजी दुकानात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. ती दुकानात जात असताना आरोपी संजीव चव्हाण याने तिच्यावर पाळत ठेवली. तसेच ती एकटी असल्याचे पाहून तिला आपल्या दुचाकीवर घेत तो तिला घेऊन शिवारात गेला. त्याठिकाणी त्याने तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पिडीत मुलीच्या आईने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
त्यानुसार तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील यांनी २ आॅगस्ट २०२० रोजी आरोपीला अटक करुन या गुन्ह्याचा तपास केला. पोलिसांनी पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करून गुन्ह्यात वापरलेले वाहन व पिडीत मुलगी आणि आरोपीचे कपडेही जप्त केले होते. तसेच पिडीत मुलीचा न्यायदंडाधिऱ्यांसमोर जबाब नोंदविण्यात आला होता. तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. या खटल्यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलीचा जबाब, तपासी अधिकारी, घटनास्थळ पंचांसह अन्य काही साक्षी या खटल्यात महत्वपुर्ण ठरल्या. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरुन जिल्हा व विशेष न्या. के. एस. होरे यांनी आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी व 22 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.


